न थांबता ट्रेन 240 किलोमीटर सुसाट धावत राहिली, कारण वाचाल तर तुम्हीही कौतुक कराल

एखाद्या चित्रपटासारखी घटना देशाच्या रेल्वे सेवेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. अपहरण झालेल्या मुलीला वाचवण्यासाठी एक ट्रेन कोणत्याही स्थानकावर न थांबवता सलग 240 किलोमीटर धावली आणि अपहरण झालेल्या मुलीला वाचवण्यात आले आहे. या तपासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार ही अपहरणाची घटना नसल्याचे स्पष्ट झाले. चित्रपटातील वाटणारी ही घटना मध्य प्रदेशात घडली आहे.

उत्तर प्रदेशच्या ललितपूर स्थानकातून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपर्यंत एक ट्रेन कोणत्याही स्थानकात थांबा न घेता सलग 240 किलोमीटर धावली आहे. अपहरण झालेल्या मुलीला वाचवण्यासाठी ही ट्रेन सलग चालवण्यात आली. एका व्यक्तीने आपल्या मुलीचे अपहरण केले असून तो मुलीला त्याच्यासोबत घेऊन गेला आहे. आपण त्याला ट्रेनमध्ये चढताना पाहिले आहे, अशी तक्रार एका महिलेने ललितपूर स्थानकात केली.

महिलेच्या तक्रारीची दखल घेत स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. त्यात महिलेने मुलीला ओळखले. मुलीला घेऊन एक व्यक्ती राप्तीसागर एक्स्प्रेसमध्ये चढत असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्थानकातून रवाना झालेली ही ट्रेन भोपाळपर्यंत कुठेही न थांबता सलग 240 किलोमीटर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. अपहरण झालेल्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला.

याबाबतची माहिती भोपाळ आरपीएफला पाठवण्यात आली. या ट्रेनला कुठेही थांबा न देता थेट भोपाळला आणण्यात आली. ट्रेन भोपाळला पोहचण्यापूर्वीच प्लॅटफॉर्मवर आरपीएफ आणि जीआरपीने घेराव घातला होता. प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूला जवान तैनात होते. ट्रेन स्थानकात थांबताच जवानांनी कोचमध्ये प्रवेश केला. जवानांनी ट्रेनमध्ये अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर एस 2 मध्ये वर्णन करण्यात आलेली व्यक्ती गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेल्या मुलीसोबत आढळली. आरपीएफ जवानांनी मुलीला आणि त्या व्यक्तीला जीआरपीच्या ताब्यात दिले.

तपासामध्ये ही अपहरणाची घटना नसल्याचे स्पष्ट झाले. आपण उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधील असून मुलीसोबत प्रवास करत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. त्या मुलीनेही हे आपले वडील असल्याचे सांगितले. पत्नीशी पटत नसल्याने मुलीला घेऊन तो घरातून निघाल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर ललितपूरमध्ये पोहचल्यावर पोलिसांनी पती-पत्नीला एकत्र आणले आणि त्यांच्यातील दुरावा दूर करण्यात आला आहे. एक ट्रेन सलग 240 किलोमीटर न थांबता धावल्याने मुलीला वाचवण्यासोबत एक कटुंब एकत्र आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या