
नगर शहराचे नाव बदलायचे असेल तर तो नगरकरांचा अधिकार आहे. बाहेरच्या माणसाने याबद्दल सांगणे उचित नाही, असा घरचा आहेर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपचेच आमदार असलेल्या गोपीचंद पडळकर यांना दिला आहे. दरम्यान, नगर जिह्याच्या विभाजनाला माझा विरोध असून, मी खासदार म्हणून आहे, तोपर्यंत नगर जिह्याचे विभाजन होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
खासदार विखे म्हणाले, नगर शहराच्या नामांतराचा विषय सुरू झाला आहे. मात्र, हा विषय नगरच्या स्थानिक लोकांचा आहे. महापालिकेत सर्व पक्षांचे नगरसेवक आहेत. तेथे जनरल बोर्डामध्ये याबाबत विषय होणार आहे. प्रत्येकाचे मत मतांतर आहे. कोणाचे नाव दिल्याने जिह्याचा लगेच कायापालट होईल, असे काही नाही. नाव देण्याचा विषय जिह्याबाहेरच्या व्यक्तीने उपस्थित केला आहे. नगरचे नाव बदलायचे की नाही, हा स्थानिक पातळीवरचा विषय आहे. जनता ज्या बाजूने जाईल, त्या बाजूने मी राहीन, असेही ते म्हणाले.
नगर जिल्हा विभाजनाला माझा पहिल्यापासून विरोध आहे. जिल्हा एकसंघच राहिला पाहिजे, त्याचा एकत्रितपणे विकास झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. या ठिकाणी अगोदर अनेक मंत्री होते, लोकप्रतिनिधी होते. त्यांनी जिह्याच्या दक्षिणेकडचा विकास का केला नाही, हासुद्धा प्रश्न आहे. ज्याला कामच करायचे नाही, असेच लोक विभाजनाची मागणी करतात. विभाजन करायचे असेल, तर अगोदर तुम्हाला कृती आराखडा तयार करावा लागेल, निधी द्यावा लागेल, तसेच यंत्रणा उभी करावी लागेल. हे करत असताना शाश्वत विकास कागदावर दाखवावा लागेल. कोणाचीही मागणी नसताना ठाणे जिह्याचे विभाजन झाले. मात्र, आज पालघरमधील आदिवासी बांधवांना कोणत्याही सोयी-सुविधा मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. प्रशासनाने स्थानिक पातळीवरचे प्रलंबित प्रश्न आधी सोडवावेत. जनतेची कामे व्हावीत, यासाठी शिर्डीत अपर जिल्हाधिकाऱयांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.























































