गोष्टीवेल्हाळ आजोळ

>> मृणाल कुलकर्णी

नातवंडांना आपल्या कुशीत घेऊन गोष्टी सांगणारे आजी-आजोबा हे एकेकाळी घराघरांतून दिसणारे दृश्य विविध कारणांमुळे काहीसे दुर्मिळ झालेय हे खरे आहे. नातवंडांवर बालपणी खरे संस्कार कोणाकडून केले जात असतील, तर आईनंतर नाव घ्यावे लागेल ते आजी-आजोबांचेच. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींत आपल्या नातवंडांना वळण लावताना अथवा त्यांच्यावर संस्कार करताना आजी-आजोबांनादेखील आपले बालपण आठवते. नातवंडे असोत अथवा आजी-आजोबा एकाच वयाचे होऊन खेळ आणि मजा-मस्ती करण्यात दंग होऊन जातात. या वातावरणामुळे घरात गोकुळ फुलल्याचा आनंद प्रत्येकालाच घेता येतो.

जरा काही मनाविरुद्ध झालं, तर पार करण्याची नातवंडांची हक्काची जागा म्हणजे आजी-आजोबा. टक्के टोणपे खाऊन अनुभवाची शिदोरी भरगच्च भरल्यामुळे आजी-आजोबा हे घरातील एक निर्णयाचे स्थान झालेले असते. त्यांचा शब्द हा घरात अंतिम समजला जातो. अडचणी आणि संकटांना कसे तोंड द्यायचे, याच्यासाठी त्यांच्याकडे नक्कीच संयमाचा मार्ग असतो. म्हणूनच आजी-आजोबा हे नातवंडांसह घरातील प्रत्येक सदस्याचे `हळवा कोपरा’ बनलेले असतात.
कोकणच्या रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वरचे लेखक जे. डी. पराडकर यांचे लाडोबा प्रकाशित `आजी-आजोबांच्या गोष्टी’ हे पुस्तक आधी शीर्षकामुळे आणि नंतर या पुस्तकात अनेक आजी-आजोबांवर भरभरून लिहिताना या प्रत्येकाच्या स्वभाव आणि गुणवैशिष्टय़ाचे, त्यांच्या मायाळूवृत्तीचे, काटेकोरपणाचे, शिस्तीचे, संस्कारांचे अनेक पैलू पराडकर यांनी अगदी सहजपणे व भावनाप्रधान शब्दातून उलगडल्यामुळे माझ्या मनाला कमालीचे भावले. बालपणी प्रत्येकाने केलेल्या गमतीजमती, शाळेतील शिक्षकांची शिस्त हे सारं वाचताना वाचकांना नक्कीच आपलं बालपण आठवेल.

बालपणी प्रत्येकाने आपल्या आजोळी जाऊन केलेली मज्जा वाचत असताना मामाचे गाव डोळ्यांसमोर उभे राहते. आजोळचं सारं वैभव वाचताना आजची पिढी या आनंदाला पारखी होतेय असं वाटू लागतं. प्रत्येक विवाहित स्त्राrचे माहेर हे तिच्या मुलांचे आजोळ असले तरी माहेर ही संकल्पना प्रत्येक विवाहित स्त्राrसाठी आनंददायी असते. माहेरी जाण्याची परवानगी मिळाली की, त्या स्त्राrच्या चेहऱयावर फुलणाऱया आनंदाचे वर्णन करायला शब्दही कमी पडतील. माहेरी जाऊन आल्यानंतर प्रत्येक स्त्राr येताना खूप मोठी ऊर्जा घेऊन परतत असते. माहेरचे सुंदर वर्णन पराडकर यांनी केले आहे.
घरातील आजी-आजोबा ही दोन व्यक्तिमत्त्वे कशी असतात? याचं वर्णन वाचताना आपल्याला आपलेच आजी-आजोबा आठवू लागतात. आजी-आजोबा एकमेकांची मनं कशी ओळखतात? ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे `मेड फॉर इच अदर’ म्हणजे एकमेकांसाठीच बनलेली असल्याने एकमेकांच्या मनातलं ओळखणं त्यांना सहज शक्य होत असतं. लेखकाला बालपणी व्यक्तीश: आजोबांचे प्रेम मिळालेले नसतानाही त्यांनी आजोबा या व्यक्तिमत्त्वावर मांडलेले विचार वाचकांना नक्कीच अंतर्मुख व्हायला लावणारे आहेत. राजश्री आजीने आपल्या नातवावर केलेले संस्कार सध्याच्या पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरणारे आहेत. मुले मोबाईल हातात घेतल्याशिवाय जेवत नाहीत या पारीला छेद देणारी राजश्री आजीची कथा बोध घेण्यासारखी आहे. कडबोळी हा पदार्थ सर्वांनाच आवडणारा आहे. आजीच्या हातची कडबोळी किती चविष्ट आणि खुसखुशीत होती, हे सारे वर्णन करताना लेखकाचे आजी वरील निस्सीम प्रेम दिसून येते. लाडू आजी या कथेतील आजीचे वर्णन म्हणजे एक संघर्षमय प्रवास आहे. अकाली वैधव्य आल्यानंतर एखादी स्त्राr स्वतच्या पायावर उभे राहण्यासाठी साऱया परिस्थितीचा जिद्दीने कसा सामना करते, याचे भावनिक वर्णन पराडकर यांनी केले आहे.

आजी-आजोबांच्या गोष्टी या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिमत्त्व आपल्या समोरील अवघड परिस्थितीला तोंड देत कसं यशस्वी होऊ शकलं, याचं सुंदर वर्णन करताना पराडकर यांनी प्रत्येक व्यक्तिमत्त्वातील विशिष्ट गुण हेरले आहेत. या व्यक्तिमत्त्वांनी नकळत आपल्यावरही संस्कार केले हे सांगण्याचा मोठेपणा लेखकाने वेळोवेळी दाखवला आहे. या सर्वच व्यक्तिमत्त्वांचे वर्णन करताना पराडकर यांची भाषाशैली साधी सरळ आणि सोपी आहे. हे पुस्तक वाचत असताना यातील प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला आपण भेटलो आहोत अथवा ही व्यक्तिमत्त्व आपल्याच नात्यातील आहेत, असं वाचकांना नक्कीच वाटत राहील.

चपराक आणि लाडोबा प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील यांनी लेखक जे. डी. पराडकर यांची कोकणच्या विविध विषयांवर आजवर सलग 11 पुस्तके प्रकाशित केली आहेत.

आजी-आजोबांच्या गोष्टी
लेखक : जे. डी. पराडकर
प्रकाशक : लाडोबा प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 100 ह मूल्य : 200 रु.