
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानचा माजी कर्णधार एम.एस. धोनी आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात नेहमीच तुलना होते. परंतु विराट कोहलीपेक्षाही धोनी मोठा खेळाडू असल्याचे स्पष्ट मत 1983 ला पहिला वन डे विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. आज तकच्या एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमात कपिल देव यांच्यासह माजी कर्णधार सुनील गावस्करही सहभागी झाले होते.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया देशात आणि विदेशातही दमदार कामगिरी करत आहे. असे असतानाही कपिल देव यांना तो मोठा खेळाडू आहे असे वाटत नाही. विशेष म्हणजे कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदा विश्वचषक उंचावला होता, तर धोनीच्या नेतृत्वाखाली टी इंडियाने 2007 चा टी-20 आणि 2011 चा वन डे विश्वचषक उंचावला होता.
धोनीबाबत कपिल देव यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, धोनी हिंदुस्थानचा एक मोठा आणि महान खेळाडू आहे. त्याने 90 कसोटी सामने खेळले आणि तरुणांना संधी देण्यासाठी निवृत्ती घेतली. धोनीने स्वत:पेक्षा देशाला अधिक महत्त्व दिले. त्यामुळे तो सर्वोत्तम ठरतो.





























































