एम.एस. धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चेला उधाण; सोशल मीडियावर #DhoniRetires चा ट्रेंड

859

टीम इंडियाचा फिनिशर अशी ओळख असणाऱ्या एम.एस धोनीच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा सुरू असतात. निवृत्तीबाबत किंवा पुन्हा खेळण्याबाबत धोनीने कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, धोनीबाबत सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. धोनीचा फॉर्म चांगला असून त्याने खेळणे सुरूच ठेवावे असे त्याच्या प्रशंसकांचे मत आहे. तर काहीजणांनी त्याने खेळणे थांबवावे असे म्हटले आहे.

धोनीच्या ट्रेंडनंतर अनेकजण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाले आहेत. काहीजणांनी टीम इंडियाला धोनीसारख्या फलंदाज, विकेटकिपर आणि फनिशरची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे त्याने अजूनही देशासाठी खेळावे असे मत व्यक्त करत  #NeverRetireDhoni असा ट्रेंड सुरू केला आहे. तर काहीजणांनी धोनीने आता लवकर निवृत्ती घ्यावी असे मत व्यक्त करत #ThankYouDhoni या हॅशटॅगसोबत ट्विट करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर हे ट्रेंड सुरू झाल्यावर धोनी लवकरच निवृत्तीची घोषणा करेल, अशी शक्यता व्यक्त होत असल्याने धोनीच्या प्रसशंकांनी चिंता व्यक्त केली आहे.

विश्वचषक 2019 च्या सामन्यात इंग्लंडविरोधातील उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर धोनी क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला नाही. त्यानंतर त्याने पुढील काही सामन्यांसाठी आपला विचार करू नये, असे कळवले होते. त्यानंतर तो डिसेंबरमध्ये संघात दिसेल अशी चर्चा होती. मात्र, आता सोशल मीडियावर पुन्हा वेगवेगळे ट्रेंड सुरू झाल्याने चर्चा सुरू आहेत. दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात विजय मिळाल्यानंतर धोनीने विराट कोहलीची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा करणाऱ्यांना चपराक लगावली होती. धोनीबाबत बोलणाऱ्यांना स्वतःच्या बुटाच्या लेसही बांधता येत नाही. तरीही आपण कोणाल सल्ला देत आहोत, याचे भान त्यांनी बाळगावे असे शास्त्री यांनी म्हटले होते. धोनीने संघासाठी केलेल्या कामगिरीची त्यांनी दखल घ्यावी. अनुभवी खेळाडूला आपण कधी निवृत्त व्हावे याचे चांगली जाण असते, असेही त्यांनी म्हटले होते. तरीही सोशल मीडियावर याबाबतच्या चर्चा सुरूच आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या