राज्य सहकारी बँकेला एनसीडीसीकडून पाच हजार कोटींचे कर्ज मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ५ हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवली कर्ज मंजूर केले आहे. एनसीडीसीकडून इतके मोठे कर्ज मिळवणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे.

एनसीडीसीने मंजूर केलेले कर्ज पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहे. या निधीचा वापर बँकेच्या सभासद सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करण्यासाठी करण्यात येणार आहे. या वित्तीय सहाय्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण होण्यास व त्यांच्या आर्थिक व्यवहारांना अधिक गती देण्यास मोठी मदत होणार आहे. “राज्य सहकारी बँकेला मिळालेली पाच हजार कोटींच्या कर्जाची मंजुरी ही केवळ वित्तपुरवठ्यापुरती मर्यादित नसून, ‘सहकारातून समृद्धी’ या व्यापक संकल्पनेला आर्थिक बळ देणारे महत्त्वाचे पाऊल आहे,” अशी प्रतिक्रिया राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.