कोरोना काळात 8 लाख घरांमध्ये महावितरणने पाडला प्रकाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या खडतर काळातही महावितरणने राज्यातील तब्बल आठ लाख घरांमध्ये प्रकाश पाडला आहे. आधीच लॉकडाऊन आणि त्यात वीज मीटरचा तुटवडा निर्माण झालेला असतानाही महावितरणने नवीन वीज जोडणीसाठी आलेला अर्ज तत्काळ मंजूर करत वीज जोडणी दिली आहे. लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करतानाच नवीन वीज जोडणी देण्याचे टार्गेट जवळपास 80 टक्क्यांपर्यंत पूर्ण केले आहे.

कोरोना महामारीमुळे सुरुवातीला नवीन वीज जोडणी देण्याचा वेग मंदावला होता. तसेच लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने नवीन वीज जोडणी देताना ग्राहकांना पुरवल्या जाणाऱया वीज मीटरचा तुटवडा निर्माण झाला होता. तरीही महावितरणने परिस्थितीवर मात करत वर्षभरात 8 लाख 2 हजार 782 नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत. कोकण प्रादेशिक विभागात 2 लाख 85 हजार एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जोडण्या दिल्या आहेत तर पुणे प्रादेशिक विभागात 2 लाख 28 हजार, नागपूर विभागात 1 लाख 65 हजार, संभाजीनगर विभागात 1 लाख 23 हजार नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत.

वीज मीटरचा तुटवडा संपला

लॉकडाऊन काळात महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा निर्माण झाला होता. तो आता संपुष्टात आला आहे. मार्च अखेरपर्यंत चारही प्रादेशिक कार्यालयांना 3 लाख 35 हजार नवीन मीटरचा पुरवठा करण्यात आला आहे. तर एप्रिल अखेरपर्यंत जवळपास साडेतीन लाख मीटर उपलब्ध होणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.