महावितरणची आता पवन ऊर्जेला पसंती! 200 मेगावॅट विजेच्या खरेदीसाठी टेंडर मागवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणने सौर उर्जेबरोबरच आता पवन ऊर्जा खरेदीला पसंती दिली आहे. त्यानुसार तब्बल 200 मेगावॅट वीज पवन ऊर्जा प्रकल्पातून खरेदी करण्यासाठी टेंडर मागवले आहे. प्रतियुनिट विजेचा दर 2 रुपये 52 पैसे एवढा कमी असेल असे स्पष्ट केले आहे.

केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा विभागाने पर्यावरणपूरक असलेले सौर ऊर्जा, पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर दिला आहे. तसेच राज्यातील वीज वितरण कंपन्यांनी त्यांच्या एकूण वीज वितरणाच्या 14 टक्के वीज अपारंपरिक म्हणजे सौर किंवा पवन ऊर्जा प्रकल्पातून खरेदी करणे बंधनकारक केले आहे. त्यापार्श्वभूमीवर महावितरणने 200 मेगावॅट वीज पवन ऊर्जा प्रकल्पातून खरेदी करण्यासाठी टेंडर मागवले आहे. नव्या पवन ऊर्जा प्रकल्पांबरोबरच ज्या जुन्या वीज प्रकल्पांचा वीज खरेदी करार 31 डिसेंबरपर्यंत संपणार आहे, त्यांनाही महावितरणला वीज विक्री करण्याबाबतचा करार करता येणार आहे. 2 रुपये 52 पैसे प्रतियुनिट दराने सात वर्षासाठी हा वीज खरेदी करार करता येणार आहे.

सौर प्रकल्पातील विजेच्या तुलनेत कमी वीजदर
महावितरणने आतापर्यंत सर्वात कमी 2.83 रुपये प्रतियुनिट दराने सौर प्रकल्पातील वीज खरेदी करण्याबाबत करार केला आहे. तुलनेने पवन ऊर्जेचा महावितरणने निश्चित केलेला 2.52 पैसे हा सर्वात कमी वीज दर असणार आहे. महावितरणला स्वस्त दराने वीज उपलब्ध झाल्यास भविष्यात ग्राहकांना स्वस्त दराने वीज उपलब्ध होऊ शकणार आहे.