
राज्यातील जनतेला भारनियमनाचे चटके सोसावे लागू नयेत, यासाठी कोयना धरणातून 10 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा वीजनिर्मितीसाठी देण्यात आला असला, तरी केवळ 20 दिवसांत अतिरिक्त पाणीसाठा संपणार असल्याने धरणातील अजून 5 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा पश्चिमेकडील वीजप्रकल्पासाठी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी महानिर्मिती कंपनीने राज्य शासनाला केली आहे.
पश्चिमेकडील वीजप्रकल्पासाठी लवादाने निर्धारित केलेला 67.50 टीएमसी पाणीसाठा मागणी तसा पुरवठा केल्यामुळे संपला आहे. वीजटंचाईच्या काळात कोयना जलविद्युत प्रकल्पातून रेकॉर्डब्रेक वीजनिर्मिती करण्यात आली आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाचे तथा महानिर्मिती कंपनीचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता, निर्धारित केलेल्या पाणीसाठ्याच्या माध्यमातून 3165.504 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. दररोज 25.122 दशलक्ष युनिटसाठी 0.56 टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. पश्चिमेकडे वीजप्रकल्पासाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचा कोटा संपला असला तरी शासनाने 10 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी वाढवून दिला आहे.
10 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा दिला असला, तरी दररोज पूर्ण क्षमतेने वीजप्रकल्प कार्यान्वित करून त्यासाठी पाणीवापर होत असल्याने हा 10 टीएमसी पाणीसाठा 20 दिवसांत संपणार आहे. यामुळे पुन्हा पश्चिमेकडील वीजनिर्मितीवर बंधने येऊ शकत असल्याने हा पाणीसाठा नियोजनपूर्वक वापरून फक्त उच्च मागणीच्या वेळेपुरतीच जास्त क्षमतेने वीजनिर्मिती केली तरच काही प्रमाणात पुरवता येणार आहे. यामुळे कोयना धरणातून पश्चिमेकडील वीजप्रकल्पासाठी अजून जादा 5 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा देण्यात यावा, अशी मागणी केली असल्याचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी स्पष्ट केले आहे.



























































