उल्हासनगरात महावितरण अधिकाऱ्यावर हल्ला, कनेक्शन तोडल्याचा राग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, उल्हासनगर

थकबाकी असलेल्या ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. कनेक्शन कापत असताना ग्राहकाने शिवीगाळ व दमदाटी करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली एवढेच नव्हे तर कडकडून चावादेखील घेतला. त्यात हा अधिकारी जखमी झाला आहे.

सुरेश वलेचा असे हल्लेखोराचे नाव आहे. वीज बिल न भरणाऱ्यांविरोधात महावितरणाने शहरात धडक मोहीम सुरू केली असून कनेक्शनदेखील कापले जात आहे. कॅम्प नं. 1 येथील गोलमैदान परिसरात स्वीट लॅण्ड अपार्टमेंटमध्ये राहणारा वलेचा याची थकबाकी होती. महावितरणचे अधिकारी रत्नाकर मोरे हे आपल्या सहकाऱयांसह वलेचा यांच्या घरी आले व त्यांनी कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली.

यावेळी सुरेश वलेचा व महावितरणचे अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. मीटरची वायर कट करीत असताना ग्राहकाने त्यास विरोध करीत रत्नाकर मोरे यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत खाली पाडून त्यांचा शर्ट फाडला. चष्माही तोडला आणि पोटाला कडकडून चावाही घेतला. या हल्ल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात वलेचा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र चौधरी करीत आहेत.

दरम्यान या हल्ल्यामुळे उल्हासनगरातील महावितरणचे कर्मचारी व अधिकाऱयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कारवाई करण्यासाठी जाणाऱया अधिकाऱयांवर असे हल्ले होणार असतील तर काम करायचे तरी कसे, असा सवाल करण्यात आला आहे.