
राज्यातील वीज मीटरचा तुटवडा भरून काढण्यासाठी महावितरणने तब्बल 15 लाख वीज मीटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आठवडाभरात एक लाख मीटर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वीज मीटरअभावी वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महावितरणकडून वर्षाला सुमारे 8 ते 9 लाख नवीन वीजजोडण्या दिल्या जातात. तसेच नादुरुस्त व इतर कारणांमुळे मीटर बदलणे आदींसाठी महावितरणला दरमहा दोन लाख मीटरची आवश्यकता भासते, मात्र सध्या महावितरणकडे केवळ 1 लाख 31 हजार 802 मीटर उपलब्ध आहेत. त्या पार्श्वभूमीवर नवीन वीज मीटरच्या उपलब्धतेमध्ये आणखी वाढ करण्यासाठी येत्या सप्टेंबरपर्यंत तब्बल 15 लाख नवीन वीज मीटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
z सर्वसाधारण वीज मीटरच्या खरेदीबरोबरच तब्बल दहा लाख स्मार्ट मीटर खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार दीड लाख थ्रीफेज मीटर खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मे अखेरपर्यंत उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांची वाढती मागणी बघता आणखी 20 लाख सिंगल फेज मीटर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
























































