खेळ सुधारा, नाहीतर नारळ… निवड समिती चेअरमन एम. एस. के. प्रसाद यांची तंबी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ इंग्लंड दौऱ्यातही कसोटी मालिकेत सपाटून मार खावा लागला. आता या दौऱ्यांचे पडसाद हिंदुस्थानात उमटताना दिसत आहेत. सीनियर्स खेळाडूंना योग्य संधी दिल्यानंतरही त्यांच्याकडून चमकदार कामगिरी होत नसेल तर त्यांना संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल आणि त्यांच्याऐवजी नव्या खेळाडूंना संधी देण्यात येईल, असे स्पष्ट मत हिंदुस्थानी सीनियर निवड समितीचे चेअरमन एम. एस. के. प्रसाद यांनी व्यक्त करतानाच खेळाडूंना सूचक इशाराही दिला आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

पुजारा, रहाणे यांच्या सातत्याचा अभाव
हिंदुस्थानच्या सलामीवीरांना इंग्लंडमधील कसोटी मालिकेत आपला ठसा उमटवता आला नाही, पण तेथील वातावरण हे गोलंदाजांना पोषक असल्यामुळे सलामीवीरांसमोर खडतर आव्हान उभे ठाकले जाते. त्यामुळे दोन्ही देशांतील सलामीवीर अपयशी ठरले. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या दोघांनी गेल्या काही वर्षांमध्ये हिंदुस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. मधल्या फळीतील ते भरवशाचे फलंदाज आहेत. याही मालिकेत त्यांनी अधूनमधून चमकदार कामगिरी केलीय, पण त्यांच्या कामगिरीतही सातत्याचा अभाव दिसून येत आहे, असे एम. एस. के. प्रसाद यावेळी म्हणाले.

ऑस्ट्रेलिया दौरा अन् वर्ल्ड कपची तयारी सुरू
हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिका तसेच इंग्लंडमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलियन दौऱ्यात त्यांच्याकडून त्याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. मात्र फलंदाजांना मेहनत घ्यावी लागणार आहे. कसोटी खेळणाऱ्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियात आधीच पाठवण्यात येईल. जेणेकरून तेथील वातावरण व खेळपट्टय़ांशी त्यांना जुळवून घेता येईल. त्यानंतर पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपचीही मोर्चेबांधणी सुरू झालीय. काही जागांसाठी शोध सुरू आहे असे त्यांनी पुढे नमूद केले.

अश्विन आजही जगातला सर्वोत्तम फिरकी गोलंदाज
ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत आपली चमक दाखवली होती. इंग्लंडमधील सुरुवातीच्या सामन्यांमध्येही त्याने आपला प्रभाव टाकला, पण त्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या कामगिरीत घसरण दिसून आली. तो आजही जगातला सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. सध्या हिंदुस्थानात रविचंद्रन अश्विनसह रवींद्र जाडेजा व कुलदीप यादव हे अव्वल दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत, असे एम. एस. के. प्रसाद यांना वाटते.

मयांक अग्रवालला संधी मिळणार
मयांक अग्रवालने गेल्या दहा महिन्यांत स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा काढल्या आहेत हे आम्हालाही माहीत आहे. आगामी मोसमात त्याच्या खेळाकडे आम्ही लक्ष ठेवणार आहोत. तसेच कर्नाटकचे मुख्य प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ यांनाही त्याला आगामी मोसमात जास्त संधी देण्याचे सांगण्यात आले आहे. मयांक अग्रवालला संधी देण्यात येईल, असे विश्वासाने प्रसाद यावेळी म्हणाले.