
एसटी कामगारांना अनेक वेळा संधी देऊनही ते कामावर परतण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने पेच प्रसंग उभा राहिला आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात असताना दुसरीकडे सर्वसामान्य जनताही भरडली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली असून ही कारवाई आता अधिक तीव्र करण्यात येईल, अशी भूमिका परिवहनमंत्र्यांनी घेतली आहे.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की आमच्यावर ज्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, तशीच ती सर्वसामान्य जनतेची आहे. त्यामुळे एसटी कामगारांनी संप आणखी ताणून धरू नये. त्यांनी कामावर परत यावे. दोन महिन्यांचा पगार मिळाला नाही तर एसटी कर्मचाऱ्यांचेही नुकसान होणार आहे. यात कोण्या नेत्याचे नुकसान होणार नाही. आता बडतर्फीची कारवाई सुरू झाली असून ती आणखी तीव्र करण्यात येईल, असे परब यांनी सांगितले.
एसटी कामगारांना इतर राज्याच्या परिवहन संस्थांच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जादा अशी 41 टक्के पगारवाढ दिली आहे. त्यामुळे त्यांनी अधिक ताणून धरू नये. एका शब्दावर अडून बसू नये. दर महिन्याच्या पगाराची हमी सरकारने घेतलेली आहे. बडतर्फीची कारवाई तीव्र करावी लागणार आहे. जनतेलाही उत्तर द्यावयाचे आहे. एसटी ही अत्यावश्यक सेवेत मोडते, त्यामुळे लवकरात लवकर कामावर रूजू व्हा असे कळकळीचे आवाहन परब यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.





























































