
स्वदेस चित्रपटातील शाहरुख खानची अद्ययावत बस आठवतेय का… दिल्लीतून निघालेला शाहरुख निसर्गसौंदर्य न्याहाळात बस चालवत उत्तरेतल्या एका गावात पोहोचतो…तशीच कॅम्परव्हॅन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटकांसाठी उपलब्ध दिली आहे. या व्हॅनमध्ये स्वयंपाक घरापासून बेडरुमची व्यवस्था आहे.
आज MTDC आणि MOTOHOM च्या कॅम्परवॅनचे उद्घाटन केले. ज्यांना स्वतंत्रपणे फिरायचे आहे आणि महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांना भेट देऊन महाराष्ट्राचे सौंदर्य पाहायचे आहे, त्यांना उत्कृष्ट प्रवासाची सोय व पर्यटनस्थळी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा MTDC चा प्रयत्न आहे. pic.twitter.com/6cHtfO7RMl
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 6, 2020
कोरोनामुळे पर्यटनावर परिणाम झाला आहे. पण या संकटाच्या काळातही पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीने ही कॅम्परव्हॅन पर्यटकांच्या सेवेत आणली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या व्हॅनचा शुभारंभ झाला.
या व्हॅनमध्ये स्कयंपाकघर, एक मिनी बेडरूम, लिव्हिंग रूम, मूलभूत सुविधा आणि टेरेससारख्या सुसज्ज सुविधा आहेत. म्हणजे पर्यटकांना बसच्या टपावरूनही निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येईल. पर्यटकांना हाँटेलमध्ये वास्तव्य करण्याची गरज नाही. लॉकडाऊन दरम्यान आणि त्यानंतरही कॅम्परव्हॅनमधून आरामदायी प्रवास करता येईल. पर्यटक ही व्हॅन भाड्याने घेऊ शकतात. या बसमध्ये घनकचरा व्यवस्थापनापासून सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याने पर्यटकांना सुरक्षित प्रवासासह आरोग्य व स्वच्छतेची काळजी घेता येईल.
ज्या पर्यटकांना स्वतंत्रपणे फिरायचे आहे आणि विविध पर्यटनस्थळांना भेट देऊन महाराष्ट्राचे सौंदर्य पाहायचे आहे, त्यांना उत्कृष्ट प्रवासाची सोय व पर्यटनस्थळी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक नकाशावर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.
या कार्यक्रमाला पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर–सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील उपस्थित होते.
























































