
मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त शिक्षण संस्थेच्या (आयडॉल) कला आणि वाणिज्य शाखेचा चार महिने रखडलेला निकाल युवासेनेच्या दणक्यानंतर विद्यापीठाने तातडीने जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या सत्राचा निकाल जाहीर करण्यात आला असून, दुसऱ्या सत्राचा निकाल २४ तासांत जाहीर करण्याचे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले.
‘आयडॉल’च्या या विद्यार्थ्यांची परीक्षा चार महिन्यांपूर्वी झाली होती, मात्र निकाल जाहीर झाला नव्हता. याबाबत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई यांच्याकडे विद्यार्थ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर युवासेना सिनेट सदस्यांनी ‘आयडॉल’ संचालक शिवाजी सरगर यांना जाब विचारला; मात्र त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे युवासेनेने प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू किंवा कुलसचिव याबाबत समाधानकारक तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा युवासेनेने दिला. युवासेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी आंदोलकांची भेट घेतली. सविस्तर चर्चेनंतर पहिल्या सत्राचा निकाल तातडीने जाहीर करण्यात आला. यावेळी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर, युवासेनेचे किरण पाठक यांच्यासह युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.





























































