
स्वतःचे हक्काचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तामीळनाडूतील एका तरुणाने नावीन्यपूर्ण संकल्पनेवर घर बांधायचे स्वप्न लहानपणापासून बघितले आणि आता ते पूर्ण केले. ए. जगदीश्वरन असे या तरुणाचे नाव आहे. जगदीश्वरनने मातीच्या कच्च्या विटा स्वतःच बनवल्या आणि त्यापासून मातीचे घर बांधले. सिमेंट आणि लोखंडी सळय़ांचा वापर न करता घर बांधून दाखवले आहे. कोणत्याही हवामानात हे घर टिकू शकते.
पेरांबलूर जिह्यातील वेप्पानाथताई येथे राहणाऱया 30 वर्षीय ए. जगदीश्वरनला हटके घर उभारण्याची इच्छा होती. सिमेंट आणि लोखंडी सळय़ांचा वापर न करता त्याला घर बांधायचे होते. त्यासाठी त्याने बीई सिव्हिल इंजिनीअर शिक्षण पूर्ण केल्यावर पुद्दुचेरी येथील खासगी महाविद्यालयात कॉम्प्रेस्ड स्टेबिलाईज्ड अर्थ ब्लॉक्स आणि आर्क वॉल्ट डोम यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
एसीची नाही गरज
जगदीश्वरनने घराला गुहेसारखा आकार दिला आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी 20 हजार लीटर क्षमतेची टाकी बांधली आहे. टेरेस गार्डनही आहे. घर लाल मातीचे आहे. त्याला रंगरंगोटी करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे घरात एसीची गरज नाही. पारंपरिक पद्धतीपेक्षा घर 10 टक्के अधिक महाग आहे.
- जगदीश्वरनने 2021 साली घर बांधायला सुरुवात केली. त्यासाठी लाल माती गोळा केली. मातीमध्ये अत्यंत कमी सिमेंटचा वापर करून कच्च्या विटा तयार केल्या. त्या भट्टीत भाजल्या नाहीत. 1100 चौरस फुटांच्या घरात विविध तंत्राचा वापर करण्यात आला. मातीच्या कमानी, कोपरे बनवण्यात आले. छतासाठी 10 हजार विटांचा वापर करण्यात आला.
- विटांमधील अंतर कमी करण्यासाठी सिमेंटऐवजी लाल मातीचा वापर केला. एवढेच नव्हे तर त्याच विटांचा वापर लाद्या म्हणून केला. विटांचा आधार देण्यासाठी जगदीश्वरनने पाया आणि कमानीमध्ये थोडय़ा सळय़ांचा वापर केला. दरवाजे, पायऱया किंवा खिडक्यांसाठी नवीन लाकूड न घेता पॉलीश केलेले जुने लाकूड खरेदी केले.

























































