
सामना प्रतिनिधी । देवरुख
रिमझिम पाऊस, हजारो प्रेक्षकांची उपस्थिती, टाळ्या आणि शिट्यांचा कडकडाट अशा भारलेल्या वातावरणात घाटी आणि गावठी बैल जोड्यांचा भर चिखलातील थरार पाहाण्याचा आनंद देवरुख वासियांना मिळाला.
निमित्त होते सामूहिक चिखलणी स्पर्धेचे. जय सांबा पाटगाव मंडळाने पाटगाव ग्रामपंचायती शेजारील भव्य मैदानात घाटी आणि गावठी प्रकारात ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेची वेळ सकाळी ११ ची होती मात्र १० वाजल्यापासूनच स्पर्धा स्थळ प्रेक्षकांनी खचाखच भरून गेले होते. प्रमोद अधटराव यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा प्रथमच देवरुखात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी ठरावीक अंतर देण्यात आले होते. एका वेळी एक बैलजोडी मैदानावर धावत होती. जी जोडी कमी वेळात चिखल आणि पाण्यातून हे अंतर पार करेल त्याला विजयी घोषित करण्यात आले.
घाटी प्रकारात तब्बल ४५ बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. यात देवळेतील दिलीप शिंर्के यांच्या जोडीने प्रथम, आरवलीच्या विहार कदम यांची जोडी द्वितीय तर शिंदे आंबेरीतील पंकज दळवी यांच्या जोडीला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. गावठी प्रकारात ३२ जोड्या मैदानात होत्या. यातून करंबेळेच्या सचिन धावडे यांच्या जोडीने प्रथम, साडवलीतील शंकर डोंगरे यांची जोडी द्वितीय तर कडवई मधील राजाराम चव्हाण यांच्या जोडीने तिसरा क्रमांक पटकावला.
दोन्ही प्रकारातील सर्व विजेत्याना रोख रक्कम, आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. सकाळी ११ ला सुरु झालेली स्पर्धा संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु होती. या वेळात किमान १० हजार प्रेक्षकांनी स्पर्धेला उपस्थिती लावली.





























































