
सामना प्रतिनिधी । पुणे
कारटेप 200 रूपयांना खरेदी केल्यानंतर उर्वरीत 100 रूपये परत मिळत नसल्याने गळा दाबून आणि दगडाने ठेचून खून करून मृतदेह वारजे येथे नदीत फेकून दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट तीनने दोघांना अटक केली आहे. कृष्णा गिरीष सोनवणे (वय 22, रा. आदर्शनगर, काळेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर सोमा थोरात (27) आणि इर्शाद शेख (28, दोघे रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. युनीट तीनचे वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम, उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कृष्णा, सोमा आणि इर्शाद हे तिघे लहानपणापासूनचे मित्र होते. कृष्णा वेल्डींगचे काम करत होता. इर्शाद हा भाजी विक्रेता आहे. तर सोमा हा ड्रायव्हर आहे. कृष्णा हा सोमाच्या भाचीची छेड काढत होता, त्यामुळे त्याचा कृष्णावर राग होता. तर इर्शादने कृष्णाला 200 रूपयांना कारटेप विकला होता. त्यातील 100 रूपये कृष्णाने त्याला दिले, तर 100 रूपये तो देत नव्हता. त्यामुळे या दोघांनी कृष्णाला दारू पिण्याच्या बहाण्याने 17 जानेवारीला रात्री बाराच्या सुमारास रावेत येथे गेले. तेथे या दोघांनी त्याचा गळा दाबून व डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर टेम्पोतून त्याचा मृतदेह वारजेत आणला. येथे नदीच्या पुलावरून पाण्यात मृतदेह फेकून दोघेही पळून गेले. वाडक पोलीस ठाण्यात कृष्णाची मिसिंग दाखल केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्य आयुक्त समीर शेख यांनी दिली.





























































