
मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून, आई, वडिलांचे मृतदेह घरी आढळले असून, दोन भावांनी रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत असून, त्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
आज सकाळी मुगट रेल्वेस्थानक परिसरात दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. उमेश रमेश लखे (२५), बजरंग रमेश लखे अशी या दोघांची नावे असून, या दोघांनी रेल्वेखाली येवून आत्महत्या केली असावी अशी शंका येत आहे. त्यांचे वडील रमेश होनाजी लखे आणि आई राधाबाई रमेश लखे यांचा मृतदेह त्यांच्याच घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पोलीस घटनास्थळी पोहंचले. उमेश लखे हा मनसेचा मुदखेड तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सामाजिक कार्यात त्याचा मोठा सहभाग होता. मात्र हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची माहिती पोलीस घेत आहेत. मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार या गावातील हे रहिवाशी असून, त्यांच्या घरात चार जणांचे कुटुंब आहे. मानसिक विवंचनेतून किंवा कुठल्या कारणातून ही घटना घडली की घातपात आहे, याचा शोध पोलीस घेत असून, सबंध गावात या कुटुंबाबद्दल सहानुभूती असल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.



























































