मुखी स्वदेशी, हृदयात विदेशी; हे शांती नाही तर, TRUMP विधेयक, TMC चा अणुऊर्जा विधेयकावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल

तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांनी अणुऊर्जा विधेयकवरून (शांती विधेयक) सरकारवर टीका केली आहे. गुरुवारी राज्यसभेत या विधेयकावरील चर्चेदरम्यान सागरिका घोष यांनी याचा संबंध अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जोडला. त्या म्हणाल्या, “हे शांतता विधेयक नाही, तर ट्रम्प विधेयक आहे. ट्रम्प म्हणजे द रिअॅक्टर अपग्रेडेशन मॅनेजमेंट प्रोग्राम बिल.” त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आणि म्हटले की, हे विधेयक वॉशिंग्टनला खूश करण्याचा प्रयत्न आहे.

खासदार सागरिका घोष म्हणाल्या की, “सर्वांना माहीत आहे की सरकार कोणाबरोबर उभी आहे. ही सरकार ‘हम दो हमारे दो’ विचारसरणीने काम करत आहे. एक चूक अनेक पिढ्या उद्ध्वस्त करू शकते. ही काही व्यावसायिक घडामोड नाही. तसेच हे टेलीकॉम आणि डिफेन्सही नाही.”

त्या म्हणाल्या की, “या सरकारला फक्त नफ्याची भाषा समजते, लोकांची भाषा नाही. हे विधेयक वॉशिंग्टनला खूश करण्याचा प्रयत्न आहे का? हा देशातील नागरिकांच्या सुरक्षेशी खेळत आहे. या सरकारच्या मुखी स्वदेशी आहे, पण ते हृदयाने परदेशी आहे. ते स्वावलंबी हिंदुस्थानबद्दल बोलतात आणि तरीही विदेशी लोकांसाठी असलेले विधेयक आणतात.”

सागरिका घोष पुढे म्हणाल्या की, “हे सांगताना दुःख होत आहे की, यावेळी ट्रम्प प्रशासनाचे घोषवाक्य धोरण बनले आहे. हे शांतता विधेयक नाही. हे ट्रम्प (द रिअॅक्टर अपग्रेडेशन मॅनेजमेंट प्रोग्राम) विधेयक आहे. हे विधेयक इतक्या लवकर मंजूर होऊ शकत नाही. त्यासाठी सखोल चर्चा आवश्यक आहे. फक्त चार तासांच्या चर्चेनंतर तुम्ही हे विधेयक सभागृहात मंजूर करू शकत नाही.”