म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मोहरम मिरवणुकीसाठी परवानगी नाकारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court-of-india

सर्वोच्च न्यायालयाने देशभरात मोहरम मिरवणुकीस परवानगी देण्यास नकार दिला आहे. शिया धर्मगुरु मौलान कल्बे जव्वाद यांनी देशभरात मोहरम मिरवणुकीसाठीची परवानगीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देण्यास नकार दिला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने सांगितले की, ‘सामान्य आदेशाने’ परवानगी दिल्यास अनागोंदी निर्माण होऊ शकते. तसेच कोविडचा प्रसार करण्यासाठी एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जाण्याची शक्यता देखील सुनावणीदरम्यान वर्तवली. आम्ही ते आदेश पारित करणार नाही, ज्यामुळे अनेक लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते’.

सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की, मोहरमच्या मिरवणुकीसाठी कोणतेही निश्चित स्थान नाही, जिथे निर्बंध व खबरदारी घेतली जाऊ शकते. आपण या समुदायासाठी संपूर्ण देशात निर्देश देण्याची विनंती करत आहात, असे खंडपीठाने या सुनावणी दरम्यान म्हटले आहे.

जगन्नाथ पुरी मंदिरात रथयात्रेला परवानगी देण्यात आली असल्याचा युक्तिवाद शिया धर्मगुरू कल्बे जव्वाद यांनी वकिलांद्वारे करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तीवाद फेटाळून लावला. जगन्नाथ पुरी प्रकरण एका निश्चित जागेशी निगडीत आहे, जेथे रथाला (अ) बिंदूपासून (बी) पर्यंत जावे लागले. जर येथेही एखादे विशिष्ट स्थान असते तर आम्ही धोक्याचे मूल्यांकन करू शकू आणि आदेश देऊ शकलो असतो. मात्र मोहरम संदर्भात तसे निश्चित ठिकाण नाही.

इतकेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कमीत कमी लोकांसह निश्चित भागात मिरवणूक काढण्यासाठी परवानगी पाहिजे असल्यास उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. मोहरम या वर्षी 29 ऑगस्ट, म्हणजेच शनिवारी साजरा करण्यात येणार आहे.