
सामना प्रतिनिधी । राहुरी
नगर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या राहुरीच्या मुळा धरणाचा पाणीसाठा 13090 दशलक्ष घनफुट झाला आहे. गुरूवारी सकाळी 6 वाजता मुळा धरण 50 टक्के भरले आहे.
मागील वर्षी 23 जुलैला मुळा धरणाचा पाणीसाठा 50 टक्के झाला होता. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पाऊस सुरू असल्याने गेल्या रविवार पासुन कोतुळ कडून मुळा धरणात येणारी पाण्याची आवक समाधानकारक आहे. गेल्या पाच दिवसात कोतुळ कडून मुळा धरणात 5 हजार दशलक्ष घनफुट नवीन पाणी दाखल झाले आहे. गुरूवारी सकाळी मुळा धरणात 11152 क्युसेकने तर 9 वाजता 16750 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.
नवीन पाण्याची आवक टिकुन राहिल्यास शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत मुळाधरण 14 हजार दशलक्ष घनफुट पाणीसाठ्याचा टप्पा गाठु शकणार आहे. मागील वर्षी 1 ऑगस्टला मुळा धरणाचा पाणीसाठा 15890 दशलक्ष घनफुट होऊन धरण 61 टक्के भरले होते. गुरुवारी सकाळी मुळा धरणाची पाणी पातळी 1784.30 फूट झाली आहे. मागील वर्षी 1 ऑगस्टला धरणाची पाणी पातळी 1791.60 फूटावर जावुन पोहचली होती.




























































