
पुणे, दि. 3 (प्रतिनिधी) – मुळा-मुठा नदीच्या पुनरुज्जीवन प्रश्नावर सध्या राज्य सरकार काम करत आहे. या चर्चेमध्ये काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यावर लवकरच तोडगा काढून मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवनाचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदलमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
सीईओपी कॉलेजच्या 94व्या वार्षिक जलक्रीडा महोत्सवांचे उद्घाटन रविवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी मुळा-मुठा नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या विषयावर आमची प्रदीर्घ चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये काही अडचणी समोर आल्या आहेत. नदी प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनामध्ये नदीकाठी वाढलेले काँक्रिटीकरण हा मुद्दा होता. या अतिशय महत्त्वाच्या मुद्दय़ावर आम्ही सध्या काम करत असून, लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावू. तसेच, राज्यातील गोदावरी, मिठीसह इतर काही नद्यांचेदेखील काम आम्ही हाती घेतले आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
विजेत्या खेळाडूंचा गौरव
अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 94व्या सीओपीटी रिगाटा जलक्रीडा महोत्सवास आदित्य ठाकरे व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते अभियांत्रिकी महाविद्यालयामधील रिगाटा स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या खेळाडूंचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.




























































