
न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथील सबवे स्थानकात मंगळवारी सकाळी अचानक गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे. या गोळीबारात काही जणांना गोळी लागल्याची माहिती शहर प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच स्थानकाच्या परिसरात काही स्फोटकेही आढळली आहेत. या स्फोटक उपकरणांचा स्फोट झाला नसल्याचे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात काहीजणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे. मात्र, याबाबतच्या वृत्ताला पुष्टी देण्यात आलेली नाही. ही घटना दहशतवादी हल्ला असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
गोळीबार करणाऱ्या संशयिताने बांधकाम मजूराचा पोशाख केला होता, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच एक प्रवासी गोळीबारत जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबतची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच प्रशासनाकडूनही या घटनेला उशीरा दुजोरा देण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी सेवेवर परिणाम झाला होता. तसेच काही गाड्या विलंबाने धावत होत्या. तसेच या घटनेनंतर सेवा थांबवण्यात आल्या आहेत.




























































