उत्तरपत्रिकांची पाने पलटण्यासाठी तोंडात बोट घालू नका! शिक्षकांच्या व्हॉटसअप ग्रुपवर मेसेज व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावी, बारावीचे पेपर तपासणाऱया शिक्षकांच्या व्हॉटस्ऍप ग्रुपवर कोरोनाविषयक मेसेज व्हायरल होत आहेत. बहुसंख्य परीक्षक आणि नियामक उत्तरपत्रिका तपासताना अनावधानाने तोंडात बोट घालून उत्तरपत्रिकेची पाने पलटतात. कोरोनाचे काही विषाणू सुमारे 9 तास तर काही 9 ते 12 दिवस कागदावर राहू शकतात. त्यामुळे पेपर तपासताना सावधानता बाळगा. पेपर तपासताना ओला स्पंज जवळ बाळगा, हात रूमाल सोबत ठेवा, असे मेसेज शिक्षकांच्या व्हॉटस्ऍप ग्रुपवर व्हायरल होत आहेत.

उत्तरपत्रिकेवरील बारकोड पद्धतीमुळे परीक्षक आणि नियामकांकडे आलेला उत्तरपत्रिकांचा गठ्ठा कोणत्या विभागातील आहे, हे ओळखणे कठीण आहे. मुंबई, पुणे, अमरावती, नागपूरसह अन्य जिह्यांत कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पेपर तपासताना हात आणि तोंडाचा संपर्क शक्यतो टाळा, अशा सूचना व्हॉटस्ऍपवर शिक्षकांना मिळत आहे.

मुंबई, ठाण्यातील काही शाळा 31 मार्चपर्यंत बंद

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता मुंबई, ठाणेसह राज्यातील इतर जिह्यांतील शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे येथील ऑर्चिंड इंटरनॅशनल स्कूलने 31 मार्चपर्यंत सुट्टी घोषित केली आहे. राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालकांना नोटीस पाठविली असून कोरोना बाधित देशात फिरण्यासाठी अथवा कामानिमित्त गेलेल्या पालकांना त्यांच्या पाल्याला शाळेत न पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. जुहू परिसरातील एका नामांकित शाळेनेही सुट्टी जाहीर केली आहे.

परीक्षेत सरासरी गुण देणार

सर्दी, खोकला, ताप, घशाचा संसर्ग अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास पाल्याला तत्काळ रुग्णालयात न्यावे अशा सूचनादेखील शाळांनी जारी केल्या आहेत. आजाराच्या लक्षणामुळे पालकांनी पाल्याला शाळेत न पाठविल्यास त्या पाल्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तसेच परीक्षा बुडाल्यास मागील परीक्षेतील सरासरी गुणांच्या आधारे या परीक्षेत गुण दिले जातील, असे काही शाळांनी स्पष्ट केले आहे.