मुंबईतील 663 रुग्णालयांना आगीचा धोका, अग्निप्रतिबंधक यंत्रणेत आढळल्या त्रुटी

देशातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा देणाऱया शहरांमध्ये मुंबईचे नाव आवर्जून घेतले जाते. पण मुंबईतील आरोग्य यंत्रणेला आगीपासून धोका आहे. मुंबईमधील 663 रुग्णालये ही अक्षरशः आगीच्या तोंडावर आहेत. तेथील अग्निप्रतिबंधक यंत्रणेमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. दुर्दैवाने तिथे आगीची घटना घडली तर वित्तहानीबरोबरच जीवितहानीही होऊ शकते. अग्निशमन दलाने हजारांवर रुग्णालयांची तपासणी केल्यानंतर हे भयंकर वास्तव उघड झाले आहे.

जानेवारी महिन्यात भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या विभागाला भीषण आग लागली होती. त्या आगीमध्ये 10 बालकांचा होरपळून, गुदमरून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रुग्णालयांमधील अग्निप्रतिबंधक उपाययोजनांविषयी शिवसेना आमदार संजय पोतनीस व अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर उत्तर दिले.

अग्निशमन दलाने मुंबईतील 1 हजार 324 रुग्णालयांची तपासणी केली. त्यात शासकीय रुग्णालये, महानगरपालिकेची रुग्णालये, खासगी रुग्णालये, नर्सिंग होम्स, प्रसूतिगृहे, दवाखाने, आरोग्य केंद्रे यांचा समावेश होता. तिथे अग्निप्रतिबंधक यंत्रणा पुरेशी आहे का? असेल तर ती कार्यान्वित आहे का? त्यात काही त्रुटी, दोष नाहीत ना? विद्युत प्रणाली सुरक्षित आहे का? आपत्तीकाळात बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळे आहेत का? याची अत्यंत बारकाईने पाहणी केली गेली. त्यातील 663 रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्यांना त्रुटी आढळून आल्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबईप्रमाणेच ठाणे येथील 347 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी अग्निशमन अधिकारी आणि कर्मचारी गेले तेव्हा त्यांना त्यातील 28 रुग्णालये बंद असल्याचे दिसून आले होते. 151 रुग्णालयांनी अग्निप्रतिबंधक यंत्रणेची पूर्तता केली होती तर 168 रुग्णालयांना अग्निप्रतिबंधक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती असेही नगरविकासमंत्र्यांनी सांगितले.

तीन महिन्यांत कार्यवाही करा, अन्यथा कठोर कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा

11 जानेवारीपासूनच पालिकेच्या अग्निशमन दलाकडून तातडीने मुंबईतील नर्सिंग होम, रुग्णालयांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये खासगी आणि सरकारी अशा एपूण 1324 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या