
शहरातील सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाला रोखण्यासाठी दिवसाची रात्र करणारे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सध्याचे साकीनाका विभागाचे सहायक आयुक्त रमेश नांगरे यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी रात्री नाइट राऊंड केला होता. नांगरे यांच्या आकस्मित मृत्यूने पोलीस दलात शोक व्यक्त होत आहे.
गुरुवारी सकाळी नांगरे हे घरी असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. नांगरे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी त्यांनी शेवटची नाइट राऊंड गस्त केली होती.
मूळचे पुण्याचे रहिवासी असलेले रमेश नांगरे हे 1989 बॅचचे अधिकारी. त्यांनी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत उपनिरीक्षक ते सहायक पोलीस आयुक्त या पदापर्यंत काम केले. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हा दाट लोकवस्ती असलेल्या धारावीत कोरोनाला रोखण्यासाठी पालिका, आरोग्य यंत्रणेसोबत धारावी पोलीस युद्धपातळीवर काम करत होते. कोरोनाला रोखायचे असल्यास तीन सूत्रीचा अवलंब करत धारावीत विशेष मोहीम राबवली गेली. धारावीत राहणाऱया ज्याचे हातावर पोट आहे अशांची लॉकडाऊन काळात उपासमार होऊ नये, त्यांना वेळेत दोन घास मिळावेत यासाठी नांगरे यांनी स्वयंसेवकांची फौज तयार केली होती. कोरोना योद्धा असलेल्या सहकाऱयांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून नांगरे यांनी नियोजनबद्ध उपाययोजना केल्या होत्या. त्यांच्या या कामाची दखल खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेऊन नागरे यांचा सत्कार केला होता.



























































