
मुंबई महानगर पालिकेच्या जागावाटपावरून महायुतीचे प्रमुख घटक पक्ष असणाऱया भाजप आणि शिंदे गटाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जोरबैठका सुरू आहेत. त्यातच अजित पवार गटाने 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत महायुतीला झटका देत मुंबई जिंकण्याची वल्गना करणाऱया भाजप शिंदे गटालाच थेट आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मुंबई महापालिकेत अजित पवार गट नवाब मलिकांच्या नेतृत्वात लढणार असले तर त्यांना सोबत घेण्यास भाजप आणि शिंदे गटाने विरोध केला होता. त्यानंतरही मुंबईत महायुती करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतला होता, मात्र त्यात त्यांना फारसे यश आले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत आम्ही मलिकांच्या नेतृत्वातच लढणार असल्याचे स्पष्ट करत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार गटाकडून 100 उमेदवारांची यादी जाहीर होईल, अशी माहिती नवाब मलिक यांच्या कन्या आमदार सना मलिक यांनी दिली.
मलिक कुटुंबातले तिघे मैदानात
उमेदवारांच्या यादीत नवाब मलीक यांचे भाऊ कप्तान मलिक, त्यांची सून बुशरा मलिक आणि बहीण सईदा खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कप्तान मलिक प्रभाग क्र. 165, सईदा खान प्रभाग क्र. 168 तर बुसरा मलिक प्रभाग क्र. 170 मधून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मलिक कुटुंबातील तीन जणांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर करत भाजप आणि शिंदे गटावर कुरघोडी केली आहे.
छत्रपती संभाजीनगरातील 18 उमेदवारही केले जाहीर
छत्रपती संभाजीनगरातही भाजप आणि शिंदे गटापासून फारकत घेत अजित पवार गट स्वबळावर लढत असून 18 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. मंगळवार सकाळपर्यंत आणखी दोन याद्या जाहीर करण्यात येतील असे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी सांगितले.






























































