महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा; माथाडी कामगारांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp-shivsena

सामना प्रतिनिधी। मुंबई

जगामध्ये हिंदुस्थान हे एक बलशाली राष्ट्र आहे, हा प्रभाव कायम ठेवण्यासाठी देशात स्थिर मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणे आवश्यक आहे, यासाठी मुंबई, नाशिक, रायगड, मावळसह सर्व भागांतील हजारो माथाडी कामगारांनी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन हिंदुस्थान माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार सेनेने केले आहे. हे आवाहन युनियनचे अध्यक्ष विकास मयेकर, सरचिटणीस राजेंद्र साळगावकर यांनी केले आहे.

ईस्ट इंडियन ख्रिस्ती समुदाय

ईस्ट इंडियन ख्रिश्चन समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱया मोबई गावठाण पंचायतीने युतीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन ख्रिस्ती समुदायाला केले आहे. या सामाजिक संस्थेने पूनम महाजन, गजानन कीर्तिकर आणि गोपाळ शेट्टी यांना स्वतःहून आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आम्ही पक्षापेक्षा उमेदवारांना महत्त्व देत असून आमचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार आमच्या मदतीला कसे धावून येतात हे आम्ही पाहतो असे मोबई गावठाण पंचायतीचे प्रवत्ते अल्फी डिसुझा यांनी म्हटले आहे. शेट्टी आणि कीर्तिकर यांनी आमच्या प्राथर्नास्थळासाठी आणि ईस्ट इंडियन म्युझियमकरिता गोराई येथे जमीन देण्याचे आश्वासन दिले आहे.

सोनकर खाटीक समाज

सोनकर खाटीक समाज विकास मंचाने शिवसेना-भाजप-रिपाइं (ए)-रासप महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष आर. डी. सोनकर यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील भाजप कार्यालयात नुकतीच हिंदू खाटीक समाज व उत्तर भारतीय दलित एस. सी. समाज संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी सोनकर समाजाने महायुतीला पाठिंबा जाहीर केला. यावेळी भाजपच्या अनुसूचित जाती विभगाचे मयूर देवलेकर, तानाजी बेडेकर, खाटीक समाजाचे शेखर लाड, विलास घोटणे, दिनेश आशीवाल, मदन बडगुजर, ओ. पी. चावला, किशोर भिलवारा, नरेंद्र सोनकर, अशोक सोनकर, दुर्गाप्रसाद सोनकर, लालचंद सोनकर आदी उपास्थित होते.

पुंचिकोरवे समाज

अखिल भारतीय पुंचिकोरवे समाज विकास संस्थेने लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक शिरूरसह महाराष्ट्रातील उर्वरित मतदारसंघांतील शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्या उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. पुंचिकोरवे समाजाच्या विकासाला चालना मिळावी म्हणून समाजबांधवांनी शिवसेना-भाजप महायुतीच्या राज्यातील सर्व उमेदवारांना भरघोस मतदान करावे, असे आवाहन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम जाधव यांनी पत्रक काढून केले आहे.