
मुंबईकरांचा प्रवास अधिक गतिमान करणार असल्याच्या घोषणा एकीकडे महायुती सरकार करीत आहे, मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक रस्त्यांवर संथ गतीने काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. याचा परिणाम होऊन शुक्रवारी दिवसभर पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक काsंडी झाली. यात अनेक स्पूल बसेस अडकल्यामुळे परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.
मुंबई शहर आणि उपनगरांत अनेक रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गाशेजारील सर्व्हिस रोडवरही जागोजागी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली आणि बोरिवली भागात सर्व्हिस रोडवरून जाणारी अनेक वाहने पर्यायी मार्ग म्हणून पश्चिम द्रुतगती महामार्गावरून धावत आहेत. याचा परिणाम सकाळच्या सुमारास दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी महामार्गावरील वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला होता. त्यामुळे वांद्रय़ापासून ते बोरिवलीतील मागाठणे आगारापर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. विलेपार्लेतील सहारा हॉटेल, विमानतळ परिसर, अंधेरी-चकाला, गोरेगाव, कांदिवली साईधाम आदी भागांत मोठय़ा प्रमाणावर वाहतूक काsंडी झाली होती. यामध्ये अनेक बेस्ट बसगाडय़ा आणि स्पूल बसेस अडकल्या होत्या. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. याचदरम्यान वाहतूक कोंडीमध्ये अर्धा ते एक तास स्पूल बसची रखडपट्टी होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची नाराजी व्यक्त होत आहे. पालिका तसेच सरकारच्या विविध यंत्रणांनी परीक्षांच्या हंगामापूर्वी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.
परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान, बोरिवली ते वांद्रे प्रवासात दोन तासांची रखडपट्टी
पश्चिम द्रुतगती महामार्गावरून बोरिवलीतून वांद्रेला जाण्यासाठी जास्तीत जास्त 40 मिनिटे लागतात. शुक्रवारी सकाळी याच प्रवासात दोन ते अडीच तास रखडपट्टी झाल्याचे वाहनचालक आणि प्रवाशांनी सांगितले. रस्त्यावरील कोंडीचा मनस्ताप टाळण्यासाठी अनेक प्रवासी अर्ध्यावरून रेल्वे आणि मेट्रो प्रवासाकडे वळले. काँक्रिटीकरणाच्या नियोजनशून्य कामामुळे जागोजागी वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.































































