अंधेरीच्या ‘द ललित’मध्ये नियमबाह्य लसीकरण, कोल्ड चेनऐवजी फ्रीज तर आईस बॅगऐवजी बाटल्यांचा वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी खासगी रुग्णालयांना देण्यात आलेल्या लसीकरणाचा गैरफायदा घेण्याचा प्रकार अंधेरीच्या ‘द ललित’ हॉटेलमध्ये उघड झाला असून खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांनीच या नियमबाह्य लसीकरणाची पोलखोल केली आहे. देशात हॉटेलमध्ये लसीकरणाला परवानगी नसतानाही इथे लसीकरण सुरू हेतेच शिवाय लस साठवण्यासाठी कोल्ड चेनऐवजी फ्रीजचा तर आईस बॅगऐवजी पाण्याच्या बाटल्यांचा वापर सुरू होता.

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी राज्य, पालिका, केंद्र सरकार आणि खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून नुकतेच खासगी कार्यालये, रहिवासी सोसायटय़ा आणि मोठय़ा रहिवासी संकुलांमध्येही लसीकरण सुरू झाले आहे, मात्र कोणत्याही हॉटेलमध्ये लसीकरणाला परवानगी देण्यात आलेली नाही. असे असताना अंधेरी येथील ‘द ललित’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये पॅकेजमध्ये लस दिली जात असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून महापौर किशोरी पेडणेकर यांना समजले. याची प्रत्यक्ष शहानिशा करण्यासाठी आज ‘हॉटेल ललित’मध्ये आकस्मिक पाहणी केली. यावेळी नियमबाह्य लसीकरण सुरू असून लस साठवणुकीसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचे उघड झाले.

क्रिटीकेअर रुग्णालयाची होणार चौकशी

‘द ललित’ हॉटेलमध्ये कोल्ड चेन मेंटेन केली जात नव्हती. घरगुती वापराच्या फ्रीजमध्ये कोरोना लसींचा साठा करण्यात आला होता. आईस बॅग म्हणून पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जात होता. त्यामुळे या लसीकरणाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ‘ललित’मध्ये क्रिटीकेअर रुग्णालयाच्या माध्यमातून लस दिली जात आहे. त्यामुळे क्रिटीकेअर रुग्णालयाचीही चौकशी केली जाणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.

हॉटेलचे लग्झरी पॅकेज

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या लग्झरी पॅकेजमध्ये व्यक्तीला अनेक सुविधा देण्यात येत आहेत. यात हॉटेलमध्ये थांबण्याची व्यवस्था, न्याहारी, रात्रीचे जेवण, वाय-फाय तसेच लसीकरणासाठी लसीकरण एक्स्पर्ट उपलब्ध करून देण्यात येतो. या सर्व सोयीसुविधा पाच हजार रुपयांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे म्हटले जात आहे, मात्र या लग्झरी पॅकेजला सोशल मीडियावर कडाडून विरोध होत आहे.