
अंधेरी येथील एमआयडीसी आणि सीप्झ परिसरात कुत्र्यांवर हल्ले करणारा बिबट्या अखेर आज जेरबंद झाला. या बिबटय़ाला बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुक्त करण्यात आले. अंधेरी एमआयडीसीमध्ये 9 डिसेंबरला एका बिबटय़ाने कुत्र्यावर हल्ला केल्याची माहिती ठाणे वनविभागाला परिमल वैद्य या नागरिकाने दिली होती. त्या माहितीवरून अंधेरी येथील वनपाल आणि कर्मचाऱयांनी परिसरात जाऊन अधिक माहिती घेतली. बिबटय़ापासून कोणालाही त्रास होऊ नये म्हणून परिसरात जनजागृती करण्यात आली. नागरिकांना बिबटय़ा जिथे-जिथे दिसला तिथे ट्रप कॅमेरे लावण्यात आले. प्रधान मुख्य वनसंरक्षकांची परवानगी घेऊन 20 डिसेंबर रोजी सीप्झ औद्योगिक परिसरात पिंजरा लावण्यात आला. अखेर आज पहाटेच्या सुमारास बिबटय़ा या पिंजऱयात अडकला. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, ठाण्याचे मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे आणि पशुवैद्यकीय अधिकाऱयांच्या देखरेखीखाली या बिबटय़ाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुक्त करण्यात आले.

























































