
मजूर असल्याचे दाखवून मुंबै बँकेचे बेकायदेशीरपणे अध्यक्ष बनणारे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची सोमवारी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी पुन्हा कसून चौकशी केली. बोगस मजूर प्रकरणात दरेकर यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याबाबत प्रश्न विचारून पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. गेल्या आठवड्यात दरेकर यांची पोलिसांनी साडेतीन तास चौकशी केली होती.
मजूर नसतानाही मजूर आहे, असे भासवून प्रविण दरेकर हे गेली 25 वर्षे मुंबै बँकेचे सदस्य होते. त्यापैकी दहा वर्षे संचालक व दहा वर्षे बँकेचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले. मजूर नसतानाही बँकेचे अध्यक्षपद पटकावून दरेकर यांनी गुन्हा केल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रविण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याच्या तपासाकरिता पोलिसांनी गेल्या सोमवारी दरेकर यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानुसार त्यादिवशी एम आर ए मार्ग पोलिसांनी दरेकर यांची साडेतीन तास चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवला होता. मात्र, त्या चौकशीतून आणखी काही बाबी स्पष्ट होणे आवश्यक असल्याने दरेकर यांना सोमवारी पुन्हा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले होते. सकाळी 11 वाजता दरेकर पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी मग तीन तास चौकशी करून त्यांचा रितसर जबाब नोंदवून घेतला.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्रविण दरेकर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला. तीन वाजण्याच्या सुमारास प्रविण दरेकर पोलीस ठाण्याच्या बाहेर पडले. पोलिसांनी पुन्हा चौकशीसाठी बोलावल्यास परत येईन असे दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

























































