
लोकलचे दरवाजे सर्वसामान्यांना बंद असल्याने बेस्टचे प्रवासी दिवसेंदिवस वाढतच असून आता बेस्टच्या प्रवासी संख्येने सुमारे 25 लाखांचा उंबरठा गाठला आहे. त्यामुळे बेस्टने आता लॉकडाऊनपूर्व प्रवासी संख्या गाठल्याचे बोलले जात आहे. अनलॉकनंतर बहुतेक कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. शिवाय बेस्टने संपूर्ण क्षमतेने प्रवासी घेत वाहतूक सुरू केल्याने त्यातच बेस्टच्या मदतीला एसटी महामंडळाच्या एक हजार गाडय़ा अलिकडेच भाडय़ाने घेतल्याने प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली असल्याचे म्हटले जात आहे.
22 मार्चच्या लॉकडाऊननंतर लोकलसेवा ठप्प झाल्याने अत्यावश्यक कर्मचाऱयांची वाहतूक करण्याची जबाबदारी बेस्टवर पडली. 8 जूनपासून बेस्टचा प्रवास सर्वसामान्यांना खुला करण्यात आला. बेस्टची प्रवासी संख्या सप्टेंबर महिन्यात 18 लाखांपर्यंत पोहचली होती. परंतु बसेसला गर्दी वाढू लागल्याने बेस्टच्या मदतीला 24 सप्टेंबरपासून एसटीच्या गाडय़ा दाखल होऊ लागल्या. बेस्टच्या ताफ्यात 1 हजार एसटी गाडय़ा दाखल झाल्या आहेत. एसटी गाडय़ा दाखल होण्याआधी बेस्टची प्रवासी संख्या 17 लाख 73 हजार होती.
35 लाख प्रवासी वाढविण्याची योजना
गेल्या सहा महिन्यांत बेस्टच्या ताफ्यात प्रथमच 40 टक्के गाडय़ा आल्या असून 3,500 वरून 4,900 पर्यंत बसेसची संख्या गेली आहे. पुढच्या आठवडय़ापासून 34 नव्या इलेक्ट्रीक बस रस्त्यावर उतरणार असल्याने बेस्टचा ताफा पाच हजारापर्यंत पोहचणार आहे. 2021 पर्यंत आणखी 1400 बसेस ताफ्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांत प्रवासी संख्या 35 ते 40 लाख करण्याची योजना असल्याचे सूत्रांनी स्पष्ठ केले.

























































