
सामना प्रतिनिधी। मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपविरोधात जबरदस्त राळ उडवली. पण भाजपने निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ‘आता बघाच तो व्हिडीओ’ म्हणत राज यांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात एका स्क्रीनवर राज यांच्या आरोपांचे व्हिडीओ तर दुसऱया स्क्रीनवर त्यावरील खुलासा देणारा व्हिडीओ दाखवला. ‘मित्रा, खरच तू चुकलास’ असा टोलाही शेलार यांनी राज ठाकरे यांना यावेळी लगावला.
महायुतीच्या विरोधात प्रचार करताना मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचे व्हिडीओ दाखवत नरेंद्र मोदी व अमित शहा ही जोडगोळी देशाच्या राजकीय पटलावरून नाहिशी झाली पाहिजे, असे आवाहन करीत प्रचार सभा घेतल्या. या प्रचार सभांमधील ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्य देशभर गाजले होते. मनसेने कशा प्रकारे खोटे व्हिडीओ दाखवत मतदारांची दिशाभूल केली हे दाखवण्यासाठी भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी ‘आता बघाच तो व्हिडीओ’ असे सांगत राज ठाकरे यांचे दावे खोटे ठरवले. मनसेने 32 खोटे आरोप केले होते. वेळेअभावी सर्वच दाखवणे शक्य नाही तरी प्रमुख 19 प्रकरणांची उत्तरे आम्ही देत असल्याचे आशीष शेलार यांनी सांगितले.





























































