कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात 2.2 टक्क्यांनी घट, मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांना यश

कोरोना रुग्णांच्या संख्येत सध्या वाढ झाली असली तरी गेल्या एक महिन्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात मात्र 2.2 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत एकूण मृत्यूदरही 5.4 टक्क्यावरून 4.6 टक्क्यांवर आला आहे. येत्या काळात हा मृत्यूदर आणखी कमी करू, असा विश्वास पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सुरुवातीपासून मुंबई महानगरपालिकेने अहोरात्र मेहनत घेत विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवून कोरोनाला नियंत्रणात ठेवले. ऑगस्ट महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली होती. मात्र, गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गणेशोत्सवाच्या काळात लोक एकमेकांच्या संपर्कात आले असावेत त्याचबरोबर कोरोना चाचण्या वाढवल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या हजार ते दोन हजारांनी वाढली, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. रुग्णांवर कोरोना सेंटर्सवर थेट उपचार सुरू असतानाच फोनवरून वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी 35 तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूकही नुकतीच करण्यात आली आहे. त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोलाचा ठरत आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली.

मुंबईत 10 लाखांहून अधिक चाचण्या

कोरोनाला रोखण्यासाठी काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेने कोरोना चाचण्यात कमालीची वाढ केली असून सहा महिन्यांत सोमवारपर्यंत मुंबईने 10 लाखांचा टप्पा पार केला. मुंबईत आतापर्यंत 10 लाख 4 हजार 17 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 80,542 वर पोहोचली आहे. पालिकेने आरटी-पीसीआर तसेच अँटिजेन चाचण्यात वाढ केली आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, पोलीस, बेस्ट, सफाई कर्मचारी यांच्यासाठी तसेच ज्या विभागांत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत, अशा विभागांत अँटिजेन चाचण्यांसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे.

4,777 सामान्य, 271 आयसीयू बेड रिक्त

मुंबईत काही दिवसांत रुग्ण वाढले असले तरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सर्वातोपरी उपचार मिळावेत, यासाठी अतिरिक्त बेड उपलब्ध आहेत. जम्बोसह लहान कोरोना सेंटर्संमध्ये आतापर्यंत 4 हजार 777 बेड उपलब्ध असून गंभीर रुग्णांसाठी 271 आयसीयू बेड उपलब्ध आहेत. त्याबरोबर रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन तसेच बेडचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिकेचे 24 वॉर्डमध्येही वॉर रूमही कार्यरत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या