एक रुग्ण आढळला तरी संपूर्ण इमारतीमधील रहिवाशांची चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या ‘डी’ वॉर्डमध्ये नियंत्रणात आलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने एक रुग्ण आढळला तरी संपूर्ण इमारतीमधील रहिवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक सोसायटीत आरोग्य शिबीर घेण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून ‘डी’ वॉर्डमध्ये दररोज सरासरी 80 रुग्ण आढळू लागल्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याची माहिती सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.

कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून युद्ध पातळीवर काम सुरू असल्यामुळे मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे. मात्र काही भागात अजूनही रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये ‘डी’ वॉर्डमधील मलबार हिल, पेडर रोड अशा उच्चभ्रू वस्तींमध्ये गेल्या चार दिवसांपासून कोरोना पुन्हा वाढत असल्याचे समोर आले आहे. या प्रभागात गेल्या काही दिवसांत दररोज सरासरी 35 ते 40 रुग्ण आढळत होते. मात्र चार दिवसांत सरासरी 80 रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. ‘डी’ वॉर्डमध्ये चाळी-इमारतींसह सुमारे 12 हजार प्रॉपर्टी आहेत. यामधील पाच हजारांवर उच्चभ्रू वस्त्यांमध्येच सध्या कोरोनाची वाढ जास्त दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून सोसायटय़ांध्ये मोफत कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये लक्षणे असल्यास ‘आयटीपीसीआर’ स्वॅब टेस्ट तर लक्षणे नसल्यास अँटिजन टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.

कोरोना चाचण्या वाढल्या

‘डी’ वॉर्डमध्ये याआधी दररोज सरासरी 300 ‘आयटीपीसीआर’ स्वॅब टेस्ट केल्या जात होत्या. मात्र या टेस्टची संख्या आता 400 करण्यात आली आहे. शिवाय सुमारे 150 अँटिजन टेस्टही केल्या जात आहेत. टेस्टचे प्रमाण वाढल्यामुळेही रुग्णवाढ दिसत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अशी आहे सद्यस्थिती

  • ‘डी’ वॉर्डमध्ये आतापर्यंत 6337 कोरोनाबाधित आढळले असले तरी यातील 5 हजार 289 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे या प्रभागात आता 803 ऍक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत.
  • ‘डी’ वॉर्डमध्ये आतापर्यंत 245 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रभागात आठवडाभराची सरासरी वाढ 1.09 टक्के आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 64 दिवस आहे.