
कोरोनाबाधित रुग्णांना औषध-पाणी, जेवण-नाष्टा देण्यासाठी आता अत्याधुनिक रोबोट वापरला जाणार आहे. वायफाय आणि कॉम्प्युटर-लॅपटॉपच्या माध्यमातून कोरोना हेल्थ सेंटरमध्ये सुुविधा पुरवली जाणार असल्यामुळे कोरोनाबाधितांना सुविधा तर मिळणार आहेच, शिवाय डॉक्टर-आरोग्य कर्मचारी यांचा रुग्णांपासून होणारा कोरोनाचा संसर्गही टळणार आहे. पालिकेच्या जी-साऊथ विभागात या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून युद्धपातळीवर काम केले जात आहे. यामध्ये काही वेळा कोविड हेल्थ सेंटरमध्ये डॉक्टर्स, आरोग्य कर्मचार्यांसह इतर सुविधा देताना कर्मचारी-अधिकार्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना हेल्थ सेंटरमध्ये रोबोटच्या माध्यमातून सुविधा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळचा चहा, औषधे, पाणी घेऊन रोबोट हेल्थ सेंटरमध्ये जाईल. दैनंदिन ठरलेल्या वेळापत्रकानुसार काम करेल. यानंतर प्रत्येक रुग्णाच्या बेडजवळ थांबेल. या ठिकाणी रुग्णाला बसल्या जागी हवी ती सुविधा मिळेल. जेवणानंतर तयार होणारा कचराही हा रोबोटच घेऊन बाहेर येईल. वायफायच्या माध्यमातून या रोबोटवर नियंत्रण ठेवून सर्व रुग्णांना ही सुविधा पुरवली जाईल. वरळी विभागातील पोदार रुग्णालय, एनएससीआय कोरोना हेल्थ सेंटरच्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू होईल. यानंतर आवश्यकतेनुसार मुंबईच्या विविध भागातील कोरोना हेल्थ सेंटरवर याचा वापर सुरू करण्यात येईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
असा होणार फायदा
– कोरानाबाधित रुग्णांना सुविधा देताना पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट घालूनच सेवा द्यावी लागते. यामध्ये प्रतिकिट सुमारे 500 रुपये खर्च येतो. मोठ्या कोरोना हेल्थ सेंटरमध्ये एका वेळी चार पाच जणांना किट वापरावे लागतात. मात्र रोबोटच्या माध्यमातून सेवा दिल्यामुळे हा खर्च वाचणार आहे. शिवाय व्यक्तींचा रुग्णांशी प्रत्यक्ष संपर्क येणार नसल्याने संसर्ग टळणार आहे.
– या रोबोटवर सुमारे ३ किमीपर्यंत नियंत्रण ठेवता येणार आहे. त्यामुळे विस्तीर्ण जागेत सुरू असलेल्या कोरोना हेल्थ सेंटरवर याचा वापर करता येणार आहे. विशेष म्हणजे हा रोबो संपूर्णपणे हिंदुस्थानी बनावटीचा आहे. हा रोबो वॉटरप्रूफ आहे.






























































