मुंबईकरांना मोठा दिलासा; 6 विभागांत डबलिंग रेट 20 दिवसांवर, मृत्यूदरही 3.2 टक्क्यांवर

1638

राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने कोरोनाविरोधात एकत्रितपणे राबवलेल्या मोहिमेला आता टप्प्याटप्प्याने यश येऊ लागले असून मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी (Doubling Rate) आता 13 वरुन 16 दिवस झाला आहे तर महापालिकेच्या 24 पैकी 6 विभागांमध्ये हे प्रमाण 16 दिवसांवरून 20 दिवसांवर आले आहे. मृत्यू दराचे प्रमाणही गेल्या काही दिवसांपासून 3.2 इतके आहे. जे राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आहे तर कोरोनामुक्त होण्याचे एकूण प्रमाण 43 टक्के झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य आणि महानगर पालिका अहोरात्र मेहनत घेत आहेत. कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यापासून ते पॉझिटिव्ह रुग्णांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी कोरोना सेन्टर्स, पूर्णवेळ कोरोना रुग्णालये तसेच पुरेसे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून दिले जात आहे. रुग्णांवर उपचार, आहार तसेच निरोगी व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर व्हिटॅमिन तसेच आर्सेनिक अल्बम-30 अशा गोळ्यावर भर दिला जात आहे. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबईत बाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी मंदावला आहे.

ई, एफ/उत्तर, जी/दक्षिण, जी/उत्तर, एच/पूर्व, एम/पूर्व विभागात रुग्णसंख्या मंदावली

मुंबईत बाधित रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी काही विभागणमध्ये वाढून 13 वरुन आता 16 दिवस इतका झाला आहे. काही विभागांनी त्याहून जास्त चांगली कामगिरी केली आहे. ई, एफ/उत्तर, जी/दक्षिण, जी/उत्तर, एच/पूर्व, एम/पूर्व विभागांमध्ये रुग्ण बाधित होण्याचा सरासरी कालावधी हा 16 दिवसांवरून 20 दिवसांवर आला आहे तर डी विभाग 19 दिवस, ए विभाग आणि एल विभाग 17 दिवस, के/पश्चिम विभाग 18 दिवस, बी विभाग 16 दिवस याप्रमाणे विविध विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीदरम्यान महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी कोरोनाला रोखण्यासाठी होत असलेल्या दैनंदिन कार्यवाहीचा आज आढावा घेतला. या बैठकीत ही माहिती देण्यात आली. या बैठकीला सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्त, संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, रुग्णालयांचे प्रमुख यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रुग्ण बरे होण्याचे वाढलेले प्रमाण आणि संक्रमणाचा कालावधी वाढणे या दोन्ही कामगिरीबद्दल आयुक्त चहल यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

उपचार व्यवस्थेत समन्वय, सुसूत्रता आणणार

1) वैद्यकीय प्रयोगशाळांनी (लॅब) कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर थेट व परस्पर रुग्णास दूरध्वनी किंवा मेसेज करुन कळवू नये, तर त्या बाधित रुग्णांची यादी तातडीने महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे पाठवावी. आरोग्य खात्याने त्यातून प्रशासकीय विभागनिहाय रुग्णांची नावे संबंधित विभाग कार्यालयांना तातडीने पुरवावीत. विभाग कार्यालयांमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तृतीय व चतुर्थ वर्षाच्या आंतरवासितांचे (इंटर्न) पथक नेमावे. या पथकाने संबंधित बाधित रुग्णाशी संपर्क साधून त्यांच्याशी योग्य चर्चा करावी, त्यांची माहिती घ्यावी व त्यांना आवश्यक त्या रुग्णालय अथवा केंद्रामध्ये नेण्यासाठी समन्वय साधावा, येत्या दोन ते तीन दिवसांत सर्व कार्यवाही करावी, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या.

2) रुग्णालये किंवा वैद्यकीय तज्ज्ञांनी तातडीच्या प्रकरणांमध्ये कोरोना चाचणी करायला सांगितली असल्यास, त्या प्रकरणांत वैद्यकीय प्रयोगशाळांना थेट रुग्णालयाला चाचणीचा अहवाल कळवता येईल, असेही आयुक्तांनी निर्देश दिले.

रुग्णांची धावपळ थांबणार

प्रयोगशाळांकडून पॉझिटिव्ह असल्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर अनेकदा रुग्ण गोंधळून जातात किंवा महानगरपालिकेकडून रुग्णाशी संपर्क होण्याआधीच घाबरुन जाऊन रुग्णालयांची शोधाशोध करु लागतात. त्यातून इतरांना बाधा होण्याची शक्यता असते. हा गोंधळ व धावपळ टाळता यावा, त्यांना दिलासा देता यावा यासाठी ही सुसूत्र पद्धत आता अवलंबली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या