पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग 24 तास कार्यरत, संपूर्ण यंत्रणा सज्ज!

380

मुंबईत बुधवारी धडकणार्‍या निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक ठिकाणच्या रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शिवाय पाणी साचणार्‍या ठिकाणीही आवश्यक पंप बसवण्यात आले आहेत. तसेच सर्व चौपाट्यांवर 93 लाइफ गार्ड रेस्क्यू बोट, जेट की आणि अग्निशमन दलाचे 150 फ्लड रेस्क्यू जवान आवश्यक साधनसामग्रीसह तैनात ठेवण्यात आले असून पालिकेचा आपत्कालीन विभाग 24 तास पूर्ण क्षमतेनिशी सज्ज असल्याची माहिती आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबईत उद्या येणारे निसर्ग वादळ गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठे चक्रीवादळ असले तरी पालिकेच्या माध्यमातून सर्व सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. बांधकाम सुरू असलेल्या सर्व संबंधितांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. झाडे किंवा फांद्या कोसळल्यास त्या तातडीने उचलण्यासाठी कर्मचारी, साधनसामग्री तैनात ठेवण्यात आली आहे. शिवाय शेजारील राज्यांसोबत पालिका समन्वय साधून असल्याची माहितीही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल हेदेखील उत्तम प्रकारे काम आणि सहाकार्य करीत आहेत. दरम्यान, आपण स्वत: रात्री मुंबईतील चौपाट्यांवर जाऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढवा घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

विरोधकांचे नाहक राजकारण

पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग 24 तास पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीदेखील नुकतीच पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन कौतुकही केले. असे असताना भाजपच्याच आशीष शेलार यांच्याकडून हा विभागच बंद असल्याचे सांगणे म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे. दोघांच्या बोलण्यात विसंगती यामुळे समोर आली असून विरोधकांचे हे नाहक राजकारण असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

कोविड केंद्रांच्या मजबुतीची तपासणी

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सुरू केलेल्या सर्व तात्पुरत्या कोविड केंद्रांच्या मजबुतीची तपासणी करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. याशिवाय नागरिकांनीही आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे. दरम्यान, बीकेसीत एमएमआरडीएने मैदानावर उभारलेल्या कोविड आरोग्य केंद्रातील २०० हून अधिक रुग्णांना पक्के बांधकाम वरळी एनएससीआय असणार्‍या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या