पालिका कर्मचार्‍यांची ‘दिवाळी’! 15 हजार 500 रुपये बोनस जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिका कर्मचार्‍यांना बोनस देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर दिवाळीसाठी यावर्षी 15 हजार 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याबाबत सोमवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घोषणा केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 500 रुपये वाढीव देण्यात आले आहेत. यामुळे पालिकेच्या सुमारे 1 लाख 11 हजार कर्मचार्‍यांची दिवाळी गोड झाली आहे.

यावर्षी कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे बोनसबाबत काय होणार असा प्रश्न कर्मचार्‍यांना पडला होता. त्यामुळे कर्मचारी संघटना समन्वय समितीनेही पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठकही झाली होती.

कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून इतरांसाठी काम करणार्‍या कामगारांना हक्काचे सानुग्रह अनुदान मिळायलाच हवे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार समन्वय समितीसोबत पालिकेच्या झालेल्या निर्णायक चर्चेनंतर महापौरांनी 15500 रुपये बोनस दिला जाणार असल्याचे जाहीर केले. यावेळी उपमहापौर अ‍ॅड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम, अ‍ॅड. रचना अग्रवाल, रंजना नेवाळकर, चंद्रकांत जाधव, निमंत्रक अ‍ॅड. प्रकाश देवदास, वामन कविस्कर, दिवाकर दळवी आदी उपस्थित होते. दरम्यान, सानुग्रह अनुदान देण्यासाठी पालिकेवर 153.14 कोटींचा बोजा पडणार आहे.

असे मिळणार सानुग्रह अनुदान

पालिका कर्मचारी – 15500/-

अनुदानित खासगी प्राथमिक शिक्षक – 7750/-

पालिका शिक्षण सेवक – 4700/-

खासगी प्राथमिक शिक्षण सेवक – 2350/-

आरोग्य सेविका (भाऊबीज भेट) – 4400/-

‘बेस्ट’बाबत लवकरच निर्णय

पालिका कर्मचार्‍यांना बोनस जाहीर झाला असला तरी ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. मात्र ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत प्रशासनाच्या पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा यासाठी ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांना पत्रही दिले आहे.