80 टक्के रुग्णांत लक्षणे नाहीत, 15 टक्क्यांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे; पालिकेचा ‘कोरोना लढा’ विजयी मार्गावर!

1796

मुंबईत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 जूनपर्यंत 44 हजारांवर पोहोचली असली तरी यातील 18 हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. विशेष म्हणजे सध्या पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी तब्बल 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, तर 15 टक्के रुग्णांमध्ये मध्यम तर 5 टक्के रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे 25 हजार 141 अ‍ॅक्टिव्ह केसेस राहिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनांनुसार हे काम सुरू आहे. पालिकेच्या माध्यमातून महापौर किशोरी पेडणेकर, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचा कोरोनाविरोधातील लढा आता ‘विजया’चा मार्गावर आहे.

टॉसिलिझुमॅब इंजेक्शन, आर्सेनिक अल्बम-30 प्रभावी
मार्चमध्ये मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीला कोरोनावर सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास अशा लक्षणांनुसार औषधोपचार करण्यात येत होते. मात्र नियमित उपचारांबरोबरच आता टॉसिलिझुमॅब इंजेक्शनचा उपचारासाठी वापर केला जात आहे. याशिवाय आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथिक गोळ्यांचाही वापरही प्रभावी होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचे प्रमाण वाढले आहे. या शिवाय मल्टीव्हिटॅमिन आणि रोगप्रतिकारण शक्ती वाढवणार्‍या औषधांचा वापर केला जात असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 43 टक्के झाले आहे.

25 दिवसांत एक लाख, दररोज चार हजार चाचण्या
पालिकेच्या माध्यमातून दररोज तब्बल चार हजार चाचण्या केल्या जात आहेत. 3 फेब्रुवारी रोजी मुंबईत पहिली चाणणी करण्यात आली होती तर 11 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. यानंतर 3 फेब्रुवारी ते 6 मे या कालावधीत मुंबईत एक लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर 1 जून रोजी दोन लाख चाचण्यांचा टप्पा पार झाला. म्हणजेच 6 मे ते 1 जून या कालावधीत अवघ्या 25 दिवसांत दररोज 4 हजार या प्रमाणे एक लाख चाचण्या पूर्ण करण्यात आल्या.

देशात सर्वाधिक चाचण्या मुंबईत
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चच्या गाइडलाइननुसार पालिकेच्या माध्यमातून कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. 18 मेच्या निर्देशानुसार दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडले जात होते. मात्र आता सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार आता एक चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येत आहे. यामध्ये क्ष-किरण आणि ऑक्सिजन पातळीमध्ये सुधारणा आल्यानंतर चाचण्या न करता डिस्चार्ज देऊन होम क्वारेंटाइन राहण्याची मुभा देण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत 2 लाख 12 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. हे प्रमाण प्रतिदशलक्ष 16 हजार 304 इतके आहे. हे प्रमाण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात 14 प्रयोगशाळांचा समावेश आहे.

डबलिंग रेट 16 दिवसांवर, मृत्यूदरही नियंत्रणात
रुग्णाच्या संपर्कातील जास्त जणांची तपासणी केली जात असल्यामुळे कोरोना प्रसारास आळा बसला आहे. यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 13 वरून 16 झाला आहे. 24 वॉर्डमधील 12 वॉर्डची कामगिरी यात अजूनही सरस आहे.

जी-साऊथ, जी-उत्तर अशा वॉर्डमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 25 दिवसांवर गेला आहे. तर भायखळा, वडाळा, वांद्रे, गोवंडी या भागात डबिंलग रेट 20 दिवसांवर आहे. तर डी वॉर्ड म्हणजेच ग्रँट रोड, मलबार हिल भागात डबलिंग रेट 19 दिवस, ए विभाग म्हणजेच फोर्ट, चर्चगेट, कुलाबा परिसर आणि एल (कुर्ला)मध्ये 17 दिवस, के/पश्चिम (विले पार्ले, अंधेरी, जोगेश्वरी) 18 दिवस, बी (डोंगरी, मोहमद अली रोड) 16 दिवस असा डबलिंग रेट आहे.

मुंबईत आता कोरोनाबाधित मृत्यूचा दर हा नियंत्रणात आला असून तो राष्ट्रीय सरासरीच्या जवळ म्हणजेच 3.2 टक्के आहे. 18 ते 24 मे या कालावधीत 280 रुग्ण दगावले होते. हीच संख्या 25 ते 31 मे या कालावधीत 270 आहे.

संपूर्ण मुंबईत प्रभावी निर्जंतुकीकरण
पालिकेच्या कीटकनाशक विभाग, अग्निशमन दल, घन कचरा विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईत प्रभावीपणे निर्जंतुकीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये शासकीय इमारती, पालिकेच्या इमारती, कार्यालये, रुग्णालये, बस डेपो, सार्वजनिक जागा, शौचालये, बाजारपेठा, पोलीस ठाणी अदी ठिकाणी निर्जंतुकीकर करण्यात येत आहे. यामध्ये कीटकनाशक विभागाने आतापर्यंत एक लाख दहा हजारांवर ठिकाणे-परिसर निर्जंतूक केले आहेत. तर घनकचरा विभागाकडून सुमारे आठ हजार शौचालये निर्जंतुक केली आहेत. या शिवाय अग्निशमन दलाने 31 हजार 56 चौ.कि.मी. क्षेत्राचे तर कीटननाशक विभागाकडून 97 हजार 306 चौ. कि.मी. क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

‘चेसिंग द व्हायरस’ला यश
कोरोना रुग्ण आढळल्यानंतर क्लोज काँटॅक्टमध्ये आलेल्या पाच जणांना याआधी क्वारेंटाइन करण्यात येत होते. मात्र आता पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘चेसिंग द व्हायरस’ मोहिमेत तब्बल रुग्णाच्या संपर्कातील १५ जणांना क्वारेंटाइन करून देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे. यामुळे कोरोनाच्या प्रसाराला आळा बसला आहे.

168 डायलिसिस सेंटरमुळे सुविधा
पालिकेच्या माध्यमातून डायलिसिस रुग्णांसाठी मूत्रविकार तज्ज्ञ आणि आयआयटी मुंबईच्या अभियंत्यांनी एकत्र येऊन रुग्ण व डायलिसि यंत्रणेची नवी प्रणाली विकसित केली आहे. कोरोना रुग्णाला डायलेसिसची गरज असल्याची त्याची नोंद या प्रणालीत केली जाते. यानुसार संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून रुग्णांना ही डायलिसिसची सुविधा उपलब्ध होते. यामध्ये मुंबईत एकूण 168 नोंदणीकृत डायलिसिस केंद्रे असून 17 ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तर 105 ठिकाणी कोरोनाबाधित आणि संशयित तर 7 ठिकाणी कोरोना संशयितांसाठी डायलिसिसची सुविधा उपलब्ध आहे.

आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांची महत्त्वपूर्ण भूमिका
पालिकेचे आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाच्या समन्वयातून आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत रुग्णालये, कोविड हेल्थ सेंटरला भेटी देऊन आवश्यक सूचना देण्याचे काम करीत आहेत. याशिवाय रहिवाशांना जिवनावश्यक वस्तू देणे, दररोज घरोघरी जाऊन हजारो नागरिकांची स्क्रिनिंग-तपासणी करणे, फिव्हर क्लिनिक उपक्रम राबवणे असे उपक्रम राबवण्यात येत आहेत. घोले यांच्या माध्यमातून वडाळ्यातील प्रत्येक मंडळाला तपासणी कीट देण्यात आले आहे. या शिवाय पोलिसांना फेस शिल्ड वाटप, सुरक्षेच्या साधनांचे वाटप, रोगप्रतिकारशक्ती वाढवणार्‍या औषधांचे वाटप, आंतरराष्ट्रीय विमानतळावर मेडिकल सुविधाही करण्यात आल्या. घोले यांना अनेक सामाजिक संस्था व स्थानिक मंडळांकडून सहकार्य मिळत आहे.

आरोग्य समितीचे महत्त्वपूर्ण निर्णय
आरोग्य समिती अध्यक्ष म्हणून काम करताना अमेय घोले यांनी पालिकेच्या केईएम, शीव, नायर अशा महत्त्वाच्या रुग्णालयात सीईओ नेमून कारभार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. पालिका हॉस्पिटलमध्ये इव्हिनिंग डिस्पेन्सरी सुरू.
पालिकेतील कंत्राटी डॉक्टरांचे मानधन 80 हजार, इनहाऊस डॉक्टरांचे मानधन 54 हजार केले. आरोग्य सेविकांचे मानधन दहा हजार करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्यानंतर निर्णय अमलात आणला.
वडाळा येथील अ‍ॅक्वथ लेप्रीसी हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. या ठिकाणी व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची सुविधाही उपलब्ध आहे. मृत व्यक्तीला लागणारी एनओसी आता पालिका रुग्णालयातच पोलिसांकडून उपलब्ध होत आहे.

मुंबईकरांची साथ महत्त्वाची – महापौर
महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा अहोरात्र आढावा घेतला जातो. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सर्व कोरोना हेल्थ सेंटरमध्ये महापौर नियमित व्हिजिट देऊन आवश्यक सूचना करीत आहेत. पालिकेच्या कोरोना लढ्याला आता यश येऊ लागले असून यात मुंबईकरांचे मिळालेले सहकार्य मूल्यवान असल्याचेही महापौर सांगतात. आता लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहे. हा काळ मुंबईकरांसाठी कसोटीचा आहे. प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. सोशल डिस्टंन्सिंग, खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन त्या मुंबईकरांना करतात. कोरोना लढा जिंकण्यासाठी मुंबईकरांची साथ महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या