‘मैलाचे दगड’ दाखवणार मुंबईचे हेरिटेज वैभव, महापालिकेकडून शहरातील 14 ‘माईलस्टोन’चे जतन-संवर्धन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत ब्रिटिश काळात अंतर दाखवण्यासाठी लावण्यात आलेले ‘मैलाचे दगड’ पुन्हा एकदा मुंबईचे हेरिटेज वैभव दाखवणार आहेत. पालिकेने मुंबईतील सर्व 14 ‘माईलस्टोन’चे जतन-संवर्धन करून मूळ नावे देण्याचा उपक्रम सुरू केल्यामुळे मुंबईकर-पर्यटकांसाठी ही संधी मिळणार आहे. सद्यस्थितीत 9 मैलाच्या दगडांना गतवैभव मिळवून देण्यात येत आहे.

पूर्वीच्या काळात मुंबईच्या हॉर्निमन सर्पलजवळील सेंट पॅथेड्रल थॉमस चर्च येथून मुंबई सुरू व्हायची. या ठिकाणाहून मुंबईत जाण्यासाठी घोडागाडी, बैलगाडय़ा सुटायच्या. इथून ‘झीरो’ मैलपासून मुंबईच्या पुढील मैलामैलावर हे बेसॉल्टचे पंचकोनी दगड लावण्यात आलेले होते. शीव टॅंक, किल्ला येथे शेवटचा मैलाचा दगड आहे. हेरिटेज म्हणून ग्रेड-वन म्हणून नोंद होणारे हे मैलाचे दगड मुंबईचा जसजसा विकास होत गेला, वाहतुकीची साधने बदलली तसतसे दिसेनासे झाले. मात्र एकेकाळी अंतर मोजण्यासाठी महत्त्वाचे निशाण असलेल्या दगडांना मूळ रूप देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पाठपुराव्याने मैलाच्या दगडांना पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यात येत आहे. पालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाकडून हे काम करण्यात येत आहे.

महापौरांच्या हस्ते लोकार्पण
चिंचपोकळी आर्थर रोड नाका येथील संवर्धन केलेल्या माईलस्टोनचे लोकार्पण रविवारी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार यामिनी जाधव यांच्या हस्ते झाले. लवकरच मुंबईतील सर्व ‘मैलाचे दगड’ नागरिकांना पाहता येतील. त्यादृष्टीने आवश्यक असणारे काम पालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाकडून सुरू असल्याचे यावेळी महापौर पेडणेकर यांनी सांगितले.

‘क्यूआर कोड’ही बसवणार
– पालिका क्षेत्रात असलेल्या 14 पैकी 9 मैलाच्या दगडांचा शोध लागला आहे. हे दगड सुमारे सात फुटांचे एकसंध दगड आहेत. सद्यस्थितीत सापडलेल्या दगडांचे संवर्धन केले जात आहे. यामध्ये ग्रॅनाईट फरसबंदी करण्यात येत असून या ठिकाणी माहितीही दिली जात आहे.

– शिवाय क्यूआर कोडही दाखवला जाणार असल्यामुळे मोबाईलवर त्यांचे लोकेशन पाहता येणार आहे, माहिती मिळवता येणार आहे. दरम्यान, उर्वरित 6 दगड मोठय़ा खाणीतून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कामासाठी पालिकेकडून सुमारे 24 लाखांपर्यंत खर्च करण्यात येणार आहे.