
मुंबईत निर्माण होणाऱ्या आपत्कालीन स्थितीमध्ये पालिकेच्या मदतीला धावून येणारे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) कायमस्वरूपी तैनात राहणार आहे. यासाठी पालिका क्षेत्रात ‘एनडीआरएफ’च्या कायस्वरूपी व्यवस्थेसाठी जागेचा शोध सुरू आहे. सद्यस्थितीत एनडीआरएफच्या टीमसाठी पालिकेच्या शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात व्यवस्था करण्यात आली आहे.
सात बेटांवर वसलेल्या मुंबई शहरात पावसाळ्यासह अनेक वेळा दुर्घटना घडतात. यावेळी पालिकेच्या आपत्कालीन विभागासह, अग्निशमन दल, पोलीस यांच्या मदतीने बचावकार्य केले जाते. यामध्ये मोठय़ा दुर्घटनांमध्ये पालिकेच्या सहय्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या टीमलाही पाचारण करण्यात येते.
या पार्श्वभूमीवर कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना तातडीने करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या आदेशानुसार मुंबईत तीन तुकडय़ा तैनात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या टीमच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी सध्या शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात व्यवस्था करण्यात आली आहे.
…तोपर्यंत पालिका देणार भाडेशुल्क
शहाजी राजे क्रीडा संकुलात तीन तुकडय़ा तैनात असून या क्रीडा संकुलाचा कारभार मुंबई महापालिका क्रीडा विभाग व ललितकला प्रतिष्ठान या स्वतंत्र विश्वस्त मंडळामार्फत चालवण्यात येतो. या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महापौर असून उपाध्यक्ष पालिका आयुक्त आहेत.
एनडीआरएफ पथकाची मुंबईसाठी गरज लक्षात घेता यावर्षी त्यांच्या वास्तव्याच्या खर्चात वाढ झाली आहे. यावर्षी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीसाठी 1 कोटी 28 लाख 50 हजार 100 रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तर इंधनावर 4 लाख 62 हजार रुपये अपेक्षित आहे.
एनडीआरएफच्या टीमला कायमस्वरूपी जागा मिळेपर्यंत या ठिकाणी व्यवस्था राहणार असून हा खर्च पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

























































