
कोणाचे वडील रस्त्यावर भाजी विक्री करतात, तर कोणाची आई हाऊस किपिंग तर कुणाचे वडील ड्रायव्हर अशा हलाखीच्या परिस्थितीतदेखील केवळ इच्छाशक्ती आणि परिश्रमाच्या जोरावर मुंबई महापालिकेच्या सात विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी बजाविली आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी थेट सिंगापूर येथे मजल मारली आहे. तर एका विद्यार्थ्याने आयआयटी मुंबईसारख्या प्रतिष्ठत संस्थेत प्रवेश मिळविला आहे. पर्यावरण मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या सात मुलांच्या पाठीवर शबासकीची थाप मारली असून युवासेनेतर्फे नुकताच या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मुंबईत पार पडला.
मुंबई महानगर पालिका शाळेतील सात विद्यार्थ्यांनी हलाखीच्या तसेच कठीण परिस्थितीवर मात करुन फक्त दुर्धर इच्छाशक्ती व अपार परिश्रम घेऊन शिक्षक व समाजसेवकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून देदीप्यमान यश संपादन केले आहे. यासाठी आकांक्षा फाऊंडेशनचीदेखील विशेष मदत लाभली. या सात विद्यार्थ्यांमध्ये अभ्युदय नगर महानगरपालिका शाळेतील आलिया मुल्लाने 90 टक्के गुण घेऊन सिंगापूर येथे उच्च शिक्षणाची स्काॅलरशिप मिळवली आहे. तर वडील रस्त्यावर भाजी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱया सूरज गुप्ताने थेट 92.6 टक्के गुण मिळवत आयआयटी मुंबईमध्ये मजल मारली आहे. सध्या आयआयटीमध्ये तो बीटेकचे शिक्षण घेत आहे. तर मारिया चौधरी हिचे वडील ड्रायव्हरची नोकरी करुन कसेबसा कुटुंबाचा उदारनिर्वाह करीत आहेत. मारियानेदेखील 86.6 टक्के मिळवत अशोका विद्यापीठात प्रवेश मिळवला आहे. मारियासह गणेश नायडूनेदेखील 87 टक्के मिळवत या विद्यापीठात प्रवेश मिळवला आहे. गणेशची आई हाऊस किपिंगचे काम करते. तर सबिहा खान 84.6 टक्के गुण घेऊन पुढील शिक्षण घेत आहे. सबिहाचे वडील हेदेखील ड्रायव्हर आहेत. तसेच दादर शिंदेवाडी महानगरपालिका शाळेत शिक्षण पूर्ण करणारा विवेन वैरागी 90 टक्के गुण मिळवून आणि मिताली साकारिया 89 टक्के गुण मिळवत उच्च शिक्षणासाठी स्काॅलरशिप मिळवली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांची कामगिरी लक्षात घेता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून युवासेना सिनेट सदस्यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच आयोजित केला होता. या वेळी शीतल शेठ देवरुखकर, प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे आणि निखिल जाधव यांनी पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलेले अभिनंदन पत्र, शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. सदर सोहळा अॅड. सतीश कसबे, चित्रा विश्वनाथ तसेच महापालिका विभागीय अधिकारी आर्या यांच्या सहकार्याने संपन्न झाला.
























































