पालिकेच्या सहापैकी पाच प्रभाग समित्यांवर शिवसेनेचा भगवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या वैधानिक समित्यांवर शिवसेनेने भाजपचा दारुण पराभव केल्यानंतर आज झालेल्या पाच प्रभाग समित्यांवरही शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला आहे. सहापैकी पाच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले असून केवळ एका प्रभाग समितीवर भाजप उमेदवार निवडून आला. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने शिवसेनेला मतदान केले.

दरवर्षी एप्रिलमध्ये होणार्‍या निवडणुका यावर्षी कोरोनामुळे उशिरा होत आहेत. यामध्ये आतापर्यंत झालेल्या स्थायी, शिक्षण, ‘बेस्ट’, सुधार आणि स्थापत्य समित्यांवर शिवसेना उमेदवारांनी बहुमताने बाजी मारली आहे. शिवसेनेची ही विजयी घोडदौड कायम राहिली असून प्रभाग समित्यांवरही शिवसेनेचाच भगवा फडकत आहे. 16 ऑक्टोबरपर्यंत पालिकेच्या एकूण १७ प्रभाग समित्यांची निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये आज झालेल्या ‘जी/दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे दत्ता नरवणकर यांचा एकमेवर अर्ज आल्याने ते बिनविरोधन निवडून आले. ‘जी/उत्तर’ प्रभाग समितीसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे जगदीश मक्कुनी थैवलपिल यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आले. ‘सी’ आणि ‘डी’ प्रभागासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या मीनल पटेल यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. ‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभागासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी 8 मते मिळवत भाजपच्या मकरंद नार्वेकर यांचा पाच मतांनी पराभव केला. यामध्ये 12 पैकी 11 सदस्यांनी मतदान केले तर 1 सदस्य अनुपस्थित राहिले. ‘एच पूर्व’ आणि ‘एच पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रज्ञा भूतकर यांनी 8 मते मिळवत भाजपच्या हेतल गाला यांचा चार मतांनी पराभव केला. तर ‘एफ दक्षिण’ ‘एफ उत्तर’ प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे रामदार कदम यांनी 10 मते मिळवत भाजपच्या नेहल शहा रांचा 7 मतांनी पराभव केला. प्रभाग समितीच्या निवडणुकीत पिठासीन अधिकारी म्हणून महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर अ‍ॅड. सुहास वाडकर यांनी काम पाहिले. दरम्यान, आज झालेल्या निवडणुकीसाठी पालिका आयुक्त आणि संबंधित पालिका अधिकारी उशिरा दाखल झाल्यामुळे शिवसेना नगरसेवक-नगरसेविकांनी आंदोलन केले. यानंतर पालिका आयुक्तांनी व्यस्त असल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर निवडणुका सुरळीत पार पडल्या. दरम्यान, निवडणुकीत विजयी उमेदवारांचे महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अ‍ॅड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अभिनंदन केले.

विरोधकांचीही शिवसेनेला साथ

– केंद्रातील भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे आधीच जनता प्रचंड होरपळत असल्यामुळे स्थानिक पातळीवर नागरिकांच्या हितासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे ही आमची भूमिका आहे. भाजपच्या सत्तेत कुठलीही कामे होत नाहीत. तर केवळ राजकारण आणि लोकांची दिशाभूल केली जाते. त्यामुळे प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेला मतदान केल्याचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे रवि राजा यांनी सांगितले.

– मुंबई शहराच्या विकासासाठी, हितासाठी शिवसेनाच योग्य पर्याय आहे. शिवसेनाच महानगरपालिका चालवू शकते. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत राहिलो. शिवाय राज्यातही आघाडी सरकार आहे. भविष्यकाळात महाविकास आघाडीचा मुंबईला फायदाच होईल, असे राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी सांगितले.

लेटलतीफ प्रशासनाकिरोधात ठिय्या

प्रभाग समितीच्या निकडणुकांसाठी महापौर, सभागृह नेत्यांसह सर्क पक्षांचे नगरसेवक सकाळी 9 वाजण्याआधी पालिका मुख्यालयातील सभागृहात उपस्थित होते. मात्र निवडणुकीची वेळ 10 वाजून गेल्यानंतरही संबंधित आयुक्त आणि इतर अधिकारी उपस्थित नव्हते. या पार्श्वभूमीवर सभागृह नेत्यांनी फोनवरून आयुक्तांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांसह महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी सभागृहाजवळ ठिय्या आंदोलन केले. यानंतर पालिका आयुक्तांनी व्यस्त असल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर निवडणुका सुरळीत पार पडल्या.