रेल्वेच्या जुन्या डब्यांमध्ये रेस्टॉरंट सुरू करणार, मध्य रेल्वेची अनोखी योजना

चमचमीत, झणझणीत पदार्थांच्या मेजवानीचा आस्वाद आता रेल्वेतही घेता येणार आहे. जुने इंजिन आणि प्रवासी डबे भंगारात जाऊ नये यासाठी मध्य रेल्वेने अनोखी शक्कल लढवली आहे. जुन्या डब्यांना नवा साज देत त्यात रेस्टॉरंट सुरु करण्यात येणार आहे. खवय्यांसाठी मध्य रेल्वे थीम बेस रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला असून रेल्वेगाडी हीच या रेस्टॉरंटची थीम असणार आहे.

रेल्वेचे इंजिन, प्रवासी डबे जुने झाले की त्याला भंगारात दिले जाते. मात्र मध्य रेल्वेने हे डबे भंगारात न काढता त्यांना नवा साज देत त्याचा उपयोग कसा करता येईल यावर बराच विचार केला होता.  या जुन्या इंजिन आणि डब्यांवर थोडा खर्च करुन रेस्टॉरंट बनवले तर त्याचा उपयोगही होईल आणि आर्थिक फायदाही होईल असा विचार करत मध्ये रेल्वेने रेस्टॉरंट सुरू करण्याचं ठरवलं आहे.

प्रवाशांना आवडतील अशा विविध पदार्थांची मेजवानी या रेल्वे रेस्टॉरंटमध्ये मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथील पी.डीमेलो रोड मार्गावरील प्रवेश द्वारातून आतमध्ये आल्यानंतर मोठी आणि मोकळी जागा आहे. तिथेच हे रेस्टॉरंट सुरू केलं जाणार आहे. .

या थीम रेस्टॉरंटसाठी रेल्वेने कंटात्रदाराला 28 लाखांची ऑफर दिली आहे. ट्रेन कोच, रेल्वे ट्रॅक आणि कचऱ्याचे विघटन या सगळ्याची सोय मध्य रेल्वेकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. या रेस्टॉरंटमध्ये 50 टेबल असतील असं कळालं आहे. रेल्वेच्या आतमध्ये ग्राहक बसू शकतील तसेच ते रेल्वे कोचच्या बाहेरही टेबल मांडून बसू शकतील अशीही योजना आखण्यात आली आहे. याआधी मध्यप्रदेश पर्यटन विकास महामंडळाने ही रेल्वे कोच रेस्टॉरेण्ट संकल्पना 2007 साली सुरू केली होती. शान-ए-भोपाल एक्स्प्रेस नावाने हे हॉटेल सुरू करण्यात आलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या