
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील पालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचे काम लवकरच आणखी गतिमान होणार आहे. या कामासाठी सध्या ट्रक-डंपर वाहतुकीसाठी असणारी रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंतची वेळ लवकरच वाढणार आहे. यासाठी पालिकेने आरटीओ विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
पालिकेच्या 13 हजार कोटी खर्चाच्या ‘कोस्टल रोड’ प्रकल्पावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने 17 डिसेंबर रोजी उठवल्यामुळे मुंबई सुपरफास्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी
सी-लिंकपर्यंतचा 9.98 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. स्थगितीमुळे जुलै 2019पासून बंद असलेले काम 18 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. सध्या वरळी आणि अमर सन्स या ठिकाणी काम सुरू आहे. मात्र या कामासाठी लागणाऱया मोठय़ा मशीन्स आणि इतर मोठी यंत्रे आणण्यासाठी आयव्हा ट्रक-डंपरची वाहतूक करण्यास ट्रफिक विभागाने फक्त रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंतचीच परवानगी दिली आहे. या ठरावीक वेळेमुळे कोस्टल रोडच्या कामात मर्यादा येत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे ही वेळ वाढवून देण्याची मागणी आरटीओकडे करणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
‘मेट्रो’च्या धर्तीवर परवानगी द्या!
न्यायालयाच्या आदेशामुळे कोस्टल रोडच्या कामासाठी असलेल्या निर्धारित वेळेमधील 154 दिवसांचा कालावधी स्थगितीमध्ये गेला आहे. 12 ऑक्टोबर 2018 मध्ये या कामाला सुरुवात झाली असून 13 ऑक्टोबर 2022 पर्यंत म्हणजेच चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आरटीओने ट्रक-डंपर वाहतुकीचा वेळ वाढवून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. मेट्रो-3चे काम अनेक ठिकाणी दिवसरात्र सुरू असते. याच धर्तीवर कोस्टल रोडच्या कामासाठी परवानगी द्यावी अशा मागणीचे पत्र आरटीओला देण्यात येणार आहे. स्थगितीमुळे आधीच 770 कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या हिताचा हा प्रकल्प खर्च न वाढता वेळेत पूर्ण व्हावा अशी भूमिका पालिका प्रशासनाने मांडली आहे.
- कोस्टल रोडमुळे मुंबईच्या दक्षिण टोकापासून थेट वांद्रय़ापर्यंत मुंबईकरांना टोल-फ्री रस्त्यावरून सुस्साट जाता येणार आहे. यामुळे मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार असल्याने मुंबईच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
- कोस्टल रोडमुळे वेळेची बचत 70 टक्के होईल, तर प्रतिवर्षी इंधनाची बचत 34 टक्के होईल. शिवाय टोलमुक्त आणि विनाअडथळा प्रवासासह ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.



























































