
मुंबईत 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू होणार असली तरी कोरोना खबरदारीची नियमावली पाळणे बंधनकारक राहणार आहे. यामध्ये एका वेळी एकूण क्षमतेच्या 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शक्य त्या ठिकाणी दोन सत्रांमध्ये क्लास आयोजित करण्याचे निर्देश देण्यात येतील. कॉलेजमध्ये दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. याबाबत सोमवारी पालिकेची नियमावली जाहीर होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये 20 ऑक्टोबरपासून नियमित वर्ग सुरू करण्यात येतील, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरू होण्यास अवघे चार दिवस शिल्लक राहिल्यामुळे कोणती नियमावली जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहतील आणि इतरांना ऑनलाइन शिक्षण द्यावे, असे निर्देश दिले आहेत. शिवाय स्थानिक पातळीवर विशेष लसीकरण मोहीम राबवावी असे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान, तेरावी ते पुढील विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी 18 वर्षे वयोगटातील राहणार आहेत. यामध्ये काहींचे लसीकरण पूर्ण झालेही असेल. यामध्ये 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना लसीकरण अनिवार्य नसले तरी 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांना लसीकरण आवश्यक आहे.
कॉलेजमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहणारे विद्यार्थी-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांना मास्क वापरणे बंधनकारक राहील. कॉलेज प्रशासनाने वेळोवेळी वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन करणे अनिवार्य. एका बाकावर एक विद्यार्थी, सुरक्षित अंतर अशी नियमावली असेल. – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त
विद्यार्थी-शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम
पालिका कॉलेजचे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवणार आहे. दोन डोसची सक्ती केली जाणार नाही, असे संकेत पालिकेकडून देण्यात आले असले तरी दोन डोस घेतलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईत महाविद्यालयांमध्ये सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी आहेत. यातील विद्यार्थ्यांसह 95 टक्के शिक्षकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येईल. कॉलेजच्या नजीकचे आरोग्य केंद्र, रुग्णालय समन्वयासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.


























































