लोकलचा निर्णय आज! मुंबईत कोरोना घटला तरी निर्बंध कायम

मुंबईत कोरोना आता चांगलाच घटला असून चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी रेटही कमी होऊन 3.79 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, तर रुग्ण असलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण 23.56 टक्के आहे. ही आकडेवारी समाधानकारक असली तरी मुंबईत अजूनही दररोज 500 ते 700 कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे मुंबईत पॉझिटिव्हीटी रेट ‘लेव्हल-1’ आणि ऑक्सिजन बेडचे प्रमाण ‘लेव्हल-2’च्या निकषांप्रमाणे असले तरी तूर्तास ‘लेव्हल-3’प्रमाणेच निर्बंध कायम राहणार असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज सांगितले. सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासंदर्भात टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येईल आणि त्यासंदर्भात उद्या बैठक होईल, असे सांगण्यात आले.

आयुक्त म्हणतात…

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट घसरला असला तरी आणखी काही दिवस स्थिती आणखी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुढील आठवडय़ात 2 ते 2.5 पर्यंत किंवा त्यापेक्षा खाली आला तर ‘लेव्हल-2’चे नियम लागू करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल.

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट मागील आठवडय़ात 4.40 टक्के होता. या आठवडय़ात पॉझिटिव्ही रेट घटून 3.79 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. हा पॉझिटिव्हिटी रेट पुढील आठवडय़ात एक ते दीड टक्क्यापर्यंत खाली आल्यास मुंबईला ‘लेव्हल-2’मध्ये आणून निर्बंध शिथिल करता येतील.

आकडेवारीनुसार मुंबई सध्या ‘लेव्हल-1’मध्ये आली असली तरी तीन आठवडय़ांनंतर तिसरी लाट येण्याचा इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे पालिका सध्या संभाव्य तिसऱया लाटेसाठी आराखडा तयार करीत आहे.

रुग्णसंख्या कमी झाली म्हणून सर्व निर्बंध शिथिल करून सर्वांसाठी लोकल सुरू केल्यास अचानक गर्दी वाढल्याने रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे.

रुग्णसंख्या घटल्याने पुढील आठवडय़ासाठी काही निर्बंध शिथिल करण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या